नगरसेवकांनो महापालिकेतील भष्ट्राचारविरोधात आक्रमक व्हा !

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आदेश
भोसरीत विधानसभा पूर्वतयारीची बैठक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची विभागणी करून कारभार चालविला जात आहे. चुकीच्या कारभारामुळे उद्योगधंदे बंद पडत असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आक्रमक होत नसल्याच्या धागा पकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नगरसेवकांना आक्रमक होण्याचे आदेश दिले.

भोसरी एमआयडीसी येथील एका खासगी हॉटेलमध्ये शरद पवार यांनी विधानसभेच्या पूर्वतयारीची पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराने नेहमीच आपल्या विचाराला साथ दिली. आपला हा बालेकिल्ला समजला जायचा. सध्या त्यामध्ये बदल झाला आहे. महापालिकेतील सत्तेचे वाटप करून कारभार सुरू आहे.

देशातील महत्त्वाची औद्योगिकनगरी म्हणून पिंपरी-चिंचवडचा उल्लेख होतो. पूर्वीची हिंदूस्थान ऍन्टीबायोटिक्‍स आणि आताची कंपनी यामध्ये प्रचंड फरक पडला आहे. कंपनी बंद पडली असून 24 महिन्यांचे पगार कामगारांना मिळालेले नाहीत. पूर्वीच्या काळी देश-विदेशातून ही कंपनी पाहण्यासाठी महत्त्वाचे उद्योजक येत होते. एचए शिवाय इतरही अनेक उद्योग स्थलांतरीत होत आहेत. काही ठराविक कंपन्या सुरू असल्यामुळे कामगारांच्या हाताला काम आहे, मात्र उद्योगनगरीचे महत्त्व कायम टिकविण्याठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.

महापालिकेबाबत बोलताना ते म्हणाले, पालिकेतील सत्तेचे विभाजन करून सध्या कारभार चालू आहे. वाटपाच्या राजकारणाला जनता कधीही बधत नसते. सध्या महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 नगरसेवक असतानाही पालिकेतील चुकीच्या कारभारावर अपेक्षित आवाज उठविला जात नाही. आपली संख्या मोठी आहे, यामध्ये फरक झालाच पाहिजे. सर्वांची आजपासूनच कामाला लागा, असा आदेशही पवार यांनी यावेळी दिला.

चुका दुरुस्त करून कामाला लागा

लोकांनी आपल्याला ज्यावेळी नाकारले तेव्हा त्यांचे चुकले असे मानणे योग्य नाही. आपल्याकडून काहीतरी चुक झाली असावी हे लक्षात घ्या. झालेली चुक दुरुस्त करा, आपली भूमिका लोकांसमोर मांडा. पाटीलकी आता संपली असून स्थानिक बाहेरचा वाद न निर्माण करता 40 ते 50 टक्के बाहेरच्या लोकांना, कामगारांना सामावून घेवून पुढील धोरण आखा व तयारीला लागा, अशा सूचनाही पवार यांनी यावेळी केल्या.

काळजी घेतली नाही तर..

शहरातील उद्योगांची काळजी आपण घेतली नाही तर इंडस्ट्री बंद होतील, अशी भीती शरद पवार यांनी यावेळी व्यक्‍त केली. उद्योग बंद पडल्यास कामगारांच्या हातचे काम जाईल. त्यामुळे हे शहर आपल्या विचाराचे असल्याने आपल्याला सर्वांची काळजी घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. शहराच्या जडणघडणीमध्ये अनेकांनी मेहनत घेतली आहे. उद्योग व्यवसाय वाढतील याकडे लक्ष द्या, असेही पवार यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.