चीनमध्ये उगमस्थान असलेल्या करोना विषाणूने अडीच हजारांहून अधिक बळी घेतल्यानंतर त्याचा फैलाव युरोपसह अन्य देशांमध्येही पसरला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजार कोसळले असून, मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजार सातत्याने आपटी खात आहे. स्टेट बॅंकेच्या अर्थतज्ज्ञांनी या तिमाहीतही अर्थव्यवस्था वाढीचा दर साडेचार टक्केच राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.
आधीच बाजारपेठेतील मागणी मंदावली असून, जागतिक बाजारपेठेतही नरमाई आहे. त्यामुळे भारताची निर्यातही घसरलेली आहे. जगातील बड्या बड्या कंपन्या धास्तावल्या असून, आपल्या गुंतवणुकी सुरक्षित राहतील की नाही, याची चिंता त्यांना भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर सॉफ्टबॅंक ग्रुप या टोकिओस्थित बहुराष्ट्रीय उद्योगसमूहामधील घडामोडींकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. या समूहाने सॉफ्टबॅंक कॉर्पोरेशन, सॉफ्टबॅंक व्हिजन फंड, आर्म होल्डिंग्ज, बोस्टन डायनॅमनिक्स, अलीबाबा, याहू जपान, ओला, उबेर, इनमोबी, हाइक, स्नॅपडील, पेटीएम, ओयो, फॅनॅटिक्स, पिंग अँड इन्शुरन्स, वुइ वर्क, पार्क जॉकी आदी अनेक कंपन्यांमध्ये भागभांडवली गुंतवणूक केली आहे.
सॉफ्टबॅंकच्या व्हिजन फंडात शंभर अब्ज डॉलर्सचे भागभांडवल आहे. तो जगातील सर्वात मोठा तंत्रज्ञानकेंद्री व्हेंचर कॅपिटल फंड आहे. मासायोशी सन यांनी स्थापन केलेली ही कंपनी फोर्ब्सच्या ग्लोबल 2000च्या यादीत 36वे स्थान मिळवणारी कंपनी आहे. टोयोटानंतरची ती जपानमधील सर्वात मोठी कंपनी आहे. सॉफ्टबॅंकची स्थापना 1981 साली झाली. सॉफ्टवेअरचे वितरण करण्याचे काम त्यांनी सुरू केले आणि नंतर त्यांनी मासिकांचे प्रकाशन सुरू केले. त्यांच्या पीसी या संगणक व तंत्रज्ञानविषयक मासिकाचा खप 1989 साली 1 लाख 40 हजार इतका होता.
1994 मध्ये सॉफ्टबॅंकचे सार्वजनिक मर्यादित कंपनीत रूपांतर झाले. सॉफ्टबॅंकची भारतातही लक्षणीय गुंतवणूक असून, आज मात्र या कंपनीत हाणामाऱ्या सुरू झाल्या आहेत. द वॉलस्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिजन फंडाचे प्रमुख राजीव मिश्रा यांनी कारवाया करून, निकेश अरोरा आणि आलोक सामा यांची समूहातून हकालपट्टी करवून घेतली. मुळात वुइ वर्क आणि उबेरमधील समूहाची गुंतवणूकच खर्चिक बनली असल्याची टीका झाली आहे. आता मिश्रा यांच्या विरुद्धच्या आरोपांची चौकशी केली जात असल्याची माहिती मासायोशी यांनी दिली आहे.
अरोरा हे सॉफ्टबॅंकेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते. त्यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांतून बातम्या पेरण्यात आल्या. लैंगिक प्रकरणात त्यांना ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न झाला. सन यांचे वारसदार म्हणून अरोरा यांच्याकडे बघितले जात होते. परंतु अनैतिक वागणुकीचे आरोप करून भागधारकांमधून एक मोहीम चालवण्यात आली. सामा यांच्या विरोधातही प्रचारमोहीम सुरू करण्यात आली. ते मिश्रा यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यानंतर अरोरा यांना 2016च्या जूनमध्ये जावे लागले. तर सामा 2019च्या एप्रिलमध्ये कंपनीबाहेर पडले. आता याबद्दलच्या पडद्यामागील घटना समोर येत असल्यामुळेच खळबळ उत्पन्न झाली आहे.
अर्थात या आरोपांत काहीही तथ्य नाही आणि कोणीही कोणाचीही बदनामी करण्याची मोहीम सुरू केली नव्हती, असा खुलासा सॉफ्टबॅंकने केला आहे. वास्तविक बॅंकिंग क्षेत्र असो वा कॉर्पोरेट क्षेत्र. तेथे गळेकापू स्पर्धा असते. उदाहरणार्थ, येस बॅंकेत मध्यंतरी काय घडले आणि राणा कपूर यांना कसे जावे लागले, ते सर्वश्रुत आहे. कंपनीच्या प्रवर्तकामध्येच संघर्ष होतो किंवा प्रवर्तक असलेल्या कुटुंबातच फाटाफूट होते.
अंबानी बधूंमधील संघर्ष गाजला होता. भारताच्या हवाई बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनी इंडिगोमध्ये राहुल भाटिया व राकेश गंगवाल यांच्यातही युद्ध सुरू आहे. सन यांना व्हिजन फंडासाठी भागभांडवल उभारण्यात मिश्रा यांनी मोठी मदत केली. परंतु वुइ वर्कची भांडवल विक्री स्थगित झाली आणि उबेरबाबतही फटका बसला. त्यानंतर सॉफ्टबॅंकच्या गुंतवणूकविषयक धोरणाबाबत टीका होऊ लागली. व्हिजन फंडाची काही धोरणे चुकीची ठरल्याचे सिद्ध झाले. मागच्या दोन तिमाहींत सॉफ्टबॅंकला फटका बसला आणि त्याचा ऑपरेटिंग लॉस नऊ अब्ज डॉलरपर्यंत जाऊन पोहोचला. पहिल्या व्हिजन फंडाची क्षमता संपल्यानंतर सॉफ्टबॅंक द्वितीय व्हिजन फंड आणण्याच्या प्रयत्नात आहे.
पहिल्या फंडापेक्षा तो मोठ्या आकाराचा असेल, असे सुरुवातीला ठरले होते. परंतु आता तेवढे भांडवल जमा होईल, असे दिसत नाही. एलियट मॅनेजमेंट या प्रसिद्ध ऍक्टिव्हिस्ट इन्व्हेस्टमेंट फर्मने सॉफ्टबॅंकमध्ये तीन टक्के भागभांडवली गुंतवणूक केली आहे. आता सॉफ्टबॅंकच्या संचालक मंडळात बदल करण्याची मागणी त्याने केली आहे. तसेच व्हिजन फंडाच्या पारदर्शकतेत सुधारणा व्हावी, असेही म्हटले आहे. मात्र एवढे असूनही, एक मोठा हेज फंड उभारून तो निधी सार्वजनिक कंपन्यांमध्ये गुंतवण्याच्या योजना मिश्रा आखत आहेत. व्हिजन फंड हा खासगी टेक्नॉलॉजी कंपन्यांत गुंतवणूक करत असताना, पुन्हा तशाच प्रकारचा दुसरा फंड उभा करणे हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
व्हिजन फंडाने आपले सर्व लक्ष पोर्टफोलिओ कंपन्यांवर केंद्रित करावे आणि दुसऱ्या फंडासाठी भागभांडवलाचा शोध घ्यावा. हे उचित होईल. मिश्रा हे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत शिकले असून, डॉटकॉमचा फुगा फुटला, तेव्हा त्या संकटातून सॉफ्टबॅंकला बाहेर आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. एकेकाळी अरोरा यांचाही सॉफ्टबॅंकमध्ये दबदबा होता. परंतु त्याच्याविरुद्ध कारस्थाने करणाऱ्या मिश्रा यांच्यावरच आता प्रतिकूलतेचा सामना करण्याची पाळी आली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात जशी सरशी होऊ शकते, तसेच खड्ड्यात जाण्याचीही पाळी येत असते, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.