नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारतात कोरोना विषाणूची तीन नवीन प्रकरणे समोर आली आहे. लडाखमध्ये दोन तर तामिळनाडूमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे.
लडाखमधील कोरोनाचा रूग्ण इराणमधून आला असून तामिळनाडूचा रुग्ण ओमानमधून आल्याची माहिती आहे. सध्या तिघांची प्रकृती स्थिर आहे.
दिल्ली, तेलंगणा, जयपूर, अमृतसरनंतर आता तामिळनाडूमध्ये कोरोनाने नागरिक त्रस्त आहेत. कोरोना विषाणूसाठी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये याची पुष्टी मिळाली आहे. आतापर्यंत देशात कोरोना रूग्णांची संख्या 34 वर पोहचली आहे.
यापूर्वी, एका व्यक्तीच्या कुटुंबातील 11 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्या सर्वाना दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
शुक्रवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना विषाणूची लागण झालेली व्यक्ती थायलंडला गेल्यानंतर त्याला कोरोना विषाणूची लागण झाली.
कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 3,497 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यापैकी सर्वाधिक 3,070 जणांचा मृत्यू चीनमध्ये झाला आहे.
कोरोना विषाणूमुळे इटलीत 197 तर इराणमध्ये 124 जण मरण पावले आहेत. जगभरात या विषाणूमुळे 102,237 जण प्रभावित झाले आहेत.
चीनमध्ये सर्वाधिक मृत्यू-
चीनमधील कोरोना विषाणूमुळे शनिवारी आणखी 28 जणांचा बळी गेला असून, या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3,070 वर पोहचली आहे . चीनच्या आरोग्य अधिका्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
भारतात 31 रुग्ण
भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 31 झाली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 18, आग्रामध्ये 6, जयपूरमध्ये 2, केरळमध्ये 3, तेलंगणामध्ये 1 आणि छत्तीसगडमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. केरळमधील तिन्ही रूग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
अमेरिकेतील उभ्या असलेल्या जहाजात 21 लोकांना कोरोना विषाणूची लागण
अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को किनाऱ्यावरील समुद्रपर्यटन जहाजात बसलेल्या 21 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेन्स यांनी सांगितले की, “कोरोना विषाणूची लागण झालेल्यांमध्ये 19 जण क्रू मेंबर्स असून दोन प्रवासी आहेत.”
माइक पेन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजावरील सर्व 3,533 प्रवासी आणि चालक दलाची तपासणी करण्यात येईल. ग्रँड प्रिन्सेस नावाचे जहाज बुधवारपासून सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अडकले आहे.