अडीच हजार जणांना घरी सोडले
पुणे – करोनाच्या महामारीत शहरात पुन्हा एक नवीन उच्चांकाची नोंद झाली असून बुधवारी बाधित संख्येने नव्हे तर करोनातून बरे झालेल्या संख्येने उच्चांक गाठला. दिवसभरात तब्बल 2 हजार 543 जणांना घरी सोडले. दरम्यान, शहरात मृत्युचा कहर सुरूच असून, दिवसभरात 39 जणांचा मृत्यू झाला.
दिवसभरात 1 हजार 308 बाधित सापडले आहेत. मागील दोन दिवसांतील तपासणीतून ही बाधित संख्या समोर आली असून, बाधित संख्या 51 हजार 728 वर पोहोचली आहे. दिवसभरात 5 हजार 919 जणांची तपासणी केली. मागील आठ दिवसांतील बाधित संख्या कमी झाल्यामुळे हा लॉकडाऊनचा परिणाम दिसतो. भविष्यात ही संख्या अजून कमी व्हावी यासाठी नागरिकांनी स्वतः खबरदारी घेणे आवश्यक आहे.
एकाच दिवसात अडीच हजार जणांना घरी सोडल्यामुळे शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या 19 हजाराहून खाली 17 हजार 861 वर आली आहे. त्यातील 845 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, तब्बल 432 बाधितांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत अचानक व्हेंटिलेटरवरील बाधितांची संख्या तब्बल तिप्पट झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर 413 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.