रत्नागिरी – जिल्ह्यातही करोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्या प्रमाणात उपाययोजना वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. कोविड रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. आजच्या घडीला 2586 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील 29 कोविड केअर सेंटर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील 29 कोविड केअर सेंटर ताब्यात घेण्यात येत आहेत. या केअर सेंटरमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असणारे रुग्ण ठेवले जात आहेत. त्यासाठी 1665 बेडची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोकणात शिमगा उत्सव सुरु झाला आहे. तसेच गुढी पाडवा लक्षात घेता, खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतलेल्या ‘टास्क फोर्स’च्या बैठकीमध्ये आरोग्य विभागालाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शासकीय रुग्णालयातही स्टाफची कमतरता लक्षात घेता पुन्हा स्टाफची भरती करण्याबाबतचे आदेश संबंधितांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, करोनाचीची लक्षणे सौम्य असली तरी त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे धोका कायम आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात 22 टनाचा ऑक्सिजनचा साठा होता. अजून वाढीव लागल्यास तो ही ठेवण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे पूर्वी घेतलेली कोविड सेंटरही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बी. एड. कॉलेजचे होस्टेल, सामाजिक न्याय भवन, तसेच आवश्यक वाटल्यास शाळाही ताब्यात घेतल्या जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.