वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची करोना विषाणूबद्दलची चाचणी “निगेटिव्ह’ आली आहे. अध्यक्षांचे डॉक्टर सीन कॉनली यांनी शनिवारी एका निवेदनात ही माहिती दिली.
जगभरात 5,300 जणांचा करोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्यावर ट्रम्प यांनी शुक्रवारी स्वतःसाठी ही चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी या चाचणीचा नकारात्मक निकाल मिळाला,
विषाणूची सकारात्मक चाचणी झालेल्या ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना ट्रम्प भेटले होते. त्यानंतर काही दिवसांनी ट्रम्प यांच्यासाठी ही चाचणी झाली. ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांचे माध्यम सहकारी असलेल्या फॅबिनो वाजनागार्तेन हे फ्लोरिडातील क्लबमधील कार्यक्रमात ट्रम्प यांच्या अगदी शेजारी उभे राहिलेले होते.
वाजनागार्तेन यांची करोनासाठीची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ट्रम्प यांनी आपली चाचणी करवून घेतली. या कार्यक्रमानंतर आठवड्याभरानेही ट्रम्प यांच्यात करोनाची लागण झाल्याची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत, असे डॉक्टरांनी म्हटलेले आहे.