मांडवगण फराटा -शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील 39 वर्षीय व्यावसायिकांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते -इसवे यांनी दिली. मांडवगण फराटा येथील माजी सरपंचांना काही दिवसांपूर्वी लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीने स्वतःचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यात हा व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. 9 जण त्यांच्या संपर्कात आले असून सर्वांना क्वारंटाइन केले आहे. आजपर्यंत मांडवगण फराटा येथे करोनाचे 10 रुग्ण सापडले असून शिरूरच्या पूर्व भागातील 6 गावांत आतापर्यंत करोनाने शिरकाव केला आहे. पूर्व भागात एकूण 23 रुग्ण सापडले असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 4 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत तर 18 जण उपचार घेत आहेत.