CoronaNews : मुंबईकरांची चिंता वाढली! करोनाच्या विळख्यात आता धारावी

मुंबई – काही दिवसांपुर्वी करोनामुक्त झालेल्या मुंबईच्या धारावी झोपडपट्टीला पुन्हा करोनाचा विळखा पडू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मार्च महिन्यात धारावीत करोनाचे एकूण 272 रूग्ण आढळून आले असून गेल्या महिन्यात सापडलेल्या एकूण रूग्णांपेक्षा ही वाढ 62 टक्क्यांची आहे असे, संबंधीतांनी सांगितले आहे.
फेब्रवारी महिन्यात धारावीत करोनाचे एकूण 168 रूग्ण आढळून आले होते. सुमारे अडीच किमी क्षेत्रावर वसलेल्या या धारावी वस्तीत करोना पुन्हा फोफावत असल्याचे दिसून आल्याने महापालिका व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि यंत्रणांची पुन्हा पळापळ सुरू झाली आहे.
धारावीत जे रूग्ण आढळून येत आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. एखाद्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून येत आहेत असे तिथे झालेले नाही. धारावीची लोकसंख्येची घनता अधिक आहे. येथे सुमारे साडे सहा लाख लोक दाटीवाटीने राहात असल्याने त्या ठिकाणी करोनाचा प्रसार पुन्हा सुरू होणे ही एक आव्हानात्मक स्थिती मानली गेली आहे. येथे करोना वणव्यासारखा पसरू शकतो अशी धास्ती सर्वांनाच आहे. कारण येथे सुरक्षित अंतर पाळणे कोणालाच शक्य नाही. येथे अनेक ठिकाणी दहा फूट बाय दहा फूट क्षेत्रफळाच्या एका खोलीत दहा-दहा जण वास्तव्याला असतात.
या वस्तीतील गल्लीबोळही अतिशय अरूंद आहेत. येथील वस्तीचा रहिवासाबरोबरच औद्योगिक वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. येथे प्रत्येक घरातच लघुउद्योग सुरू असतात. गेल्या वर्षी 1 एप्रिल रोजी धारावीत करोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर काहीच दिवसांत धारावीला हॉटस्पॉट जाहीर करावा लागला होता. तथापि तेथे योजण्यात आलेल्या व्यापक उपायानंतर जानेवारी महिन्यात धारावी करोनामुक्त झाली होती. पण आता पुन्हा धारावीला करोनाने घेरले आहे.





