नवी दिल्ली – दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील 37 डॉक्टरांना करोना झाल्याचे उघड झाले आहे. दिल्लीत सातत्याने करोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने रात्रीची संचारबंदी लागू करत कडक नियम केले आहेत.
37 डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झालेय. कोविड-19च्या सध्याच्या लाटेमुळे दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांना संसर्ग झाला आहे आणि त्यातील पाच जणांना उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत गुरुवारी सूत्रांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यांमध्ये राष्ट्रीय राजधानीत करोना विषाणूच्या बाबतीत तीव्र वाढ झाली आहे. पहिल्यांदाच 7,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
करोना रुग्णांवर उपचार करताना हे डॉक्टर संक्रमित झाले आहेत. यापैकी बहुतेक डॉक्टरांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत. एकूण 32 डॉक्टरांना सौम्य लक्षणे असून पाच डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर गंगाराम हॉस्पिटलने गेल्या एक वर्षापासून साथीच्या काळात कोविड-19च्या उपचारासाठी अग्रणी भूमिका बजावली आहे.