करोना विषाणूची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी…

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींनी दिला सरकारला सल्ला

नवी दिल्ली : देशात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यातच करोनावरील लस विकसित करण्यावर संशोधक दिवसरात्र काम करत आहेत. भारतातही करोनावरील लसीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान करोना विषाणूवरील लसीसंदर्भात कॉंग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. करोना विषाणूची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक रणनिती आखण्याची गरज असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

भारत करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये सहभागी होईल. देशाला एक स्पष्ट आणि सर्वांना सामावून घेणारी रणनिती आखायला हवी. जेणेकरून ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि सर्वांना ही लस सहजरित्या घेता येईल. केंद्र सरकारने हे आताच करायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

यापूर्वी गुरूवारी त्यांनी करोनावरील एक आलेख शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. जर ही पंतप्रधानांची नियंत्रणातील स्थिती आहे तर नियंत्रणाबाहेरील स्थिती कशी असेल?, असा सवाल त्यांनी केला होता. गेल्या महिन्यात नोवेल आयडियाज इन सायन्स अँड एथिक्‍स ऑफ वॅक्‍सिन अगेन्स्ट कोविड-19 या विषयावर एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना जर करोनावरील लस तयार झाली तर ती सर्वात प्रथम कोणाला देण्यात येईल यावर चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते. करोनाची लस सर्वात प्रथम कोणाला देण्यात यावी याविषयावर सरकारमध्ये आणि सरकार बाहेरही चर्चा सुरू आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.