नवी दिल्ली, दि. 15 – महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात 26,291 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 78 टक्के रुग्ण या पाच राज्यातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 16,620 नव्या रुग्णांची नोंद झाली. केरळ 1,792 तर पंजाबमध्ये 1,492 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशातील एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 2,19,262 आहे. यातील 77 टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यात आहेत. तर 58 टक्क्यांपेक्षा जास्त केवळ महाराष्ट्रात आहेत.
दुसरीकडे कोविड प्रतिबंधक लसीकरण मात्रेच्या एकूण 3 कोटीच्या टप्प्याकडे देशाची वाटचाल सुरू आहे. आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 2,99,08,038 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
देशभरात आतापर्यंत 1,10,07,352 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 96 टक्के आहे. गेल्या 24 तासात 17,455 रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 8,861 रुग्ण करोना मुक्त झाले. गेल्या 24 तासात 118 मृत्यू झाले. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 50 मृत्यूंची नोंद झाली आहे.