वडूज (प्रतिनिधी) – येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर बंद असल्याने एका करोनाबाधित महिलेला रुग्णालयाहेर रिक्षातच ऑक्सिजन लावायची वेळ आली. या घटनेमुळे खटाव तालुक्यात आरोग्य विभागाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, एक 75 वर्षीय वृद्ध महिला सोमवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान करोना चाचणीसाठी वडूजच्या ग्रामीण रुग्णालयात आली होती. तपासणीनंतर ती करोना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या ऑक्सिजन पातळीची तपासणी केली असता, ती प्रमाणापेक्षा कमी होती.
ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले आहे. ते सोमवारपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार होते; परंतु त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी उपलब्ध न झाल्याने ते सुरू होऊ शकले नाही.
रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू असून, तेथे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची गर्दी होती. त्यामुळे त्या करोनाबाधित महिलेला रुग्णालयाच्या बाहेर एका रिक्षात ऑक्सिजन लावायची वेळ आली.
त्यानंतर त्या महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला; परंतु तीन-चार तास रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. नातेवाइकांनी कोरेगाव येथील खासगी रुग्णवाहिकेशी संपर्क साधून, त्यातून त्या महिलेला साताऱ्याला नेण्यात आले.
या घटनेची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती. शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.