जयपूर : रुग्णालयात कोरोनाचे संशयीत दाखल… एक वाक्य कानावर… एकच हलकल्लोळ… सर्व रुग्णांची डिस्चार्ज घेण्यासाठी धाव… रुग्णालय सुनसान केवळ कोरोना संशयितासह… एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग अनुभवला राजस्थान विद्यापीठाच्या आरोग्य शास्त्र विभागाच्या रुग्णालयाने. त्याचं झालं असं, या रूग्णालयाच्या वॉर्ड क्र. 286 मध्ये कोरोनाचे संशयित दाखल करण्यात आले.
त्याची माहिती अचानक बाहेर आली. त्यानंतर त्याचा इतरेजनांनी एवढा धसका घेतला की हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांनी डिस्चार्ज घेण्यासाठी धाव घेतली. प्रत्यक्षात दहाव्या मजल्यावर असणाऱ्या अतीदक्षता विभागातील रुग्णांनीही डिस्चार्ज घेतल्याने खळबळ उडाली, याबाबतचे वृत्त भास्कर डॉट कॉम या संकेत स्थळाने दिले आहे.
या रुग्णालयाकडे केवळ तीन मेडिकल किट आहेत. कर्मचाऱ्यांना पुरवलेले मास्क हे कोरोनापासून वाचण्यासाठी पुरेसे दर्जेदार नाही. पुरूषांच्या वॉर्डात 11 रुग्ण दाखल होते. तेथे केशव धाकड हा परिचारक नियुक्तीस होता. मात्र त्या सगळ्यांनी डिस्चार्ज घेतला. सामान्य वार्डात सहा रुग्ण होते. त्यांनीही डिस्चार्ज घेतला. या आवारात असणाऱ्या वस्तीगृहात काही विद्यार्थी रहात होते. त्यांनी तातडीने आपला बोऱ्या बिस्तारा गुंडाळला.
नेहमी 400 ते 500 रुग्ण ओपीडीत येतात त्यांची संख्या बुधवारी 40-50वर आली. त्यामुळं पळा पळा कोण पुढे पळे तो अशी अवस्था निर्माण झाली… या घटनेची चर्चा जयपूरमध्ये तेल मिठ लावून रंगली असली तरी यातून कोरोनाचा धसका मात्र अधोरेखीत झाला आहे.