लंडन – ब्रिटनमह्ये आता राजधानी लंडन आणि परिसरामध्ये वेगळ्या स्वरुपातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव आढळायला लागला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे लंडन आणि परिसरामध्ये आता नव्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
हे निर्बंध उद्या (बुधवार) पासून लागू होणार आहेत. नव्या स्वरुपातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होत असल्याचे ब्रिटन सरकारने सोमवारी संसदेमध्ये सांगितले.
करोनाच्या प्रादुर्भावाचा वेग दुप्पट झालेला आहे. केवळ सातच दिवसांमध्ये ब्रिटनच्या अनेक भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे अधिक वेगवान आणि निर्णायक कृती आवश्यक असल्याचे ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅन्कोक यांनी “हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये सांगितले.
ब्रिटनमधील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या तिसऱ्या श्रेणीच्या उपाय योजना लागू करण्यात येणार आहेत. या उपाय योजना म्हणजे पूर्ण लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यासारखीच स्थिती असणार आहे. या निर्बंधांदरम्यान नागरिकांना आपल्या घरामध्ये कोणाही त्र्ययस्थाला राहू देता येणार नाही. जे आपल्या घरात राहत नाहीत, अशांना घराबाहेरच भेटता येणार आहे.
तर अदरातिथ्य सुविधा असलेले सर्व उद्योग या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना आपल्या उपयोगाच्या वस्तू पार्सल स्वरुपात नेता येऊ शकतील. तर सेवा पुरवठादारांकडून केवळ “डिलीव्हरी’ दिली जाऊ शकणार आहे. वेगळ्या स्वरुपातील करोना विषाणूचा फैलाव अधिक वेगाने होत असून त्याचा इंग्लंडच्या दक्षिणेकडील भागामध्ये पसरत असलेल्या विषाणूशी संबंध असावा अशी शक्यता आहे, असे हॅन्कोक यांनी सांगितले.
विषाणूचे स्वरुप नवीन असल्याने त्याचा प्रभाव किती असेल, याबाबत काहीही सांगता येऊ शकत नाही. मात्र त्याच्या प्रतिबंधासाठी तातडीने आणि ठोस उपाय योजना कराव्या लागणार आहेत. लस उपलब्ध होईपर्यंत या घातक आजाराला रोखण्यासाठी त्या आवश्यक आहेत, हेच दुर्दैव आहे. विषाणूचा फैलाव वेगाने होतो आहे, म्हणून आपल्यालाही अधिक वेगाने उपाय योजना कराव्या लागणार आहेत, असे ते म्हणाले.
करोना चाचणीसाठी मोबाइल टेस्टींग आणि सामूहिक चाचण्या अधिक व्यापक प्रमाणात केल्या जाणार आहेत. फायझर- बायोएनटेक लसीचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र त्यामुळे ही साथ पूर्णपणे आटोक्यात येण्याची शक्यता नाही, असेही हॉन्कॉक यांनी संगितले.
दक्षिण इंग्लंडमध्ये प्रादुर्भाव…
प्रामुख्याने दक्षिण इंग्लंडमध्ये या वेगळ्या स्वरुपातील विषाणूचा संसर्ग 1000 हून अधिक जणांना झाला असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. हे रुग्ण 60 वेगवेगळ्या वस्त्यांमधील आहेत आणि त्यांची संख्याही वेगाने वाढते आहे.
गेल्या महिन्यात इतर काही देशांमध्येही विषाणूचे वेगळे स्वरुप आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या वेगळ्या स्वरुपातील विषाणूची दखल घेतली आहे. या विषाणूमुळे अधिक भीषण रोग पसरण्याची भीतीही वर्तवली जात आहे.