सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आणखी सात करोना बाधित

पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आज नव्याने 7 करोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णालयात आत्तापर्यंत 80 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, वडगाव झांजे (ता. वेल्हा) येथील 80 वर्षीय ज्येष्ठाला रुग्णालयातून “डिस्चार्ज’ देण्यात आला.
रुग्णालयात आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील 4 रुग्ण आहेत. ताडीवाला रोड, रामनगर-येरवडा, वाघोली, वैदुवाडी-हडपसर या भागातील हे रुग्ण आहेत. त्यामध्ये तीन पुरुष आणि 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे.
त्याशिवाय, मावळ तालुक्यातील चांदखेडगाव येथील 13 आणि 14 वर्षाच्या दोन मुलांना देखील करोनाची लागण झाली आहे. तर, इचकेवाडी (ता. शिरूर) येथील 11 वर्षीय मुलीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधून 15 संशयित करोना रुग्णांना आज उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये सध्या 27 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, 21 रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे.





