केंदूर (प्रतिनिधी) – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपकेंद्रातील दोन अडतदारांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात या उपकेंद्रातील अडतदारांनी व बाजार समिती प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन हे उपकेंद्र अनेक दिवस बंदच ठेवले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणी नंतर गेल्या महिन्यात हे पिंपळे जगताप मार्केटयार्ड सुरू करण्यात आले होते. मात्र, या मार्केट यार्डमध्ये तरकारी आणि भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या एका व्यापाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या एका अडतदाराला त्रास होऊ लागल्याने त्याने शनिवारी (दि ५ ) खासगी लॅबकडून कोरोनाची चाचणी केली. सोबत आणखी एका अडतदाराने देखील खबरदारी म्हणून स्वतःची करोनाची चाचणी केली होती. त्यानंतर आज या दोन्ही अडतदारांचे अहवाल करोना बाधित आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने पिंपळे जगताप मार्केट परिसर सील केला आहे. या दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या दोन्ही अडतदारांचा संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आरोग्य विभागाला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन शिरूर तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले.
करोनाचा शिरकाव पिंपळे जगतापच्या उपकेंद्रात देखील झाला असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे येत्या किमान आठ दिवसांसाठी हे मार्केटयार्ड पूर्णपणे बंद राहणार आहे. पुढील निर्णय येईपर्यंत शेतकऱ्यांनी शेतमाल या परिसरात विक्रीसाठी घेऊन येऊ नये.
– शंकर जांभळकर, सभापती, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती