पुणे – संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा झाली तर, त्यातील 85 टक्के मुलांना धोका असणार नाही, असा अंदाज लहान मुलांसाठी स्थापन केलेल्या “टास्क फोर्स’ने वर्तविला आहे. अर्थात, हा अंदाज असला तरी तो चुकूही शकतो त्यामुळे मुलांची काळजी घेणे आणि उपचारासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना बाधा होऊ शकते, असे भाकित गेल्या अनेक दिवसांपासून वर्तवले जात आहे. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून देश, राज्य आणि स्थानिक स्वराज्यसंस्था पातळीवर “टास्क फोर्स’ स्थापन करून उपाययोजना सुरू आहेत. सरकारी आणि खासगी मिळून पुण्यात मुलांसाठी सुमारे सहा हजार बेडची व्यवस्था आहे. जर पुढच्या लाटेमध्ये बाधितांमध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त असेल तर त्यातील 85 टक्के मुलांना अतिसौम्य लक्षणे असतील.
तर 15 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असा अंदाज टास्क फोर्सचा आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 15 टक्क्यांपैकी केवळ एक-दोन टक्केच मुलांना व्हेंटिलेटर किंवा अधिक उपचाराची गरज भासू शकेल. त्यातूनही गंभीर होणाऱ्या मुलांमध्ये जन्मापासूनच अन्य शारीरिक व्याधी असणाऱ्या मुलांचा समावेश असू शकतो. त्यामध्ये मेंदूविकार, हृदयविकार किंवा अन्य गंभीर आजार यांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाने या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. लहान मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची यादी तयार केली जात आहे. यातील काही डॉक्टर्स खासगी प्रॅक्टिशनर्स आहेत की जे केवळ क्लिनिकलीच सल्ला देतात किंवा तपासतात. त्यामध्ये सर्दी, ताप, खोकला, जुलाब, लसीकरण आणि घरी राहून जे आजार बरे होऊ शकतात यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात युरिननळी लावण्यापासून ते व्हेंटिलेटर व्यवस्थापनापर्यंत सर्वच विषयाचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. एखाद्या प्रौढ, मोठ्या वयाच्या व्यक्तीला उपचार करणे शक्य आहे; परंतु लहान मुलांवर उपचार करणे अवघड असते. त्यामुळे त्यादृष्टीनेच प्रशिक्षणावर भर देण्यात येणार आहे.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 20 आयसीयू आणि 10 एनआयसीयू उभे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 105 कोटी रुपये नुकतेच मंजूर झाले आहेत. याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रुग्णालयांमध्ये जेथे बालकांवर उपचार केले जावू शकतात तेथे अशा सोयी उभारता येणार आहेत. रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्स, अन्य मूलभूत सुविधा आणि साहित्य याची उपलब्धता होऊ शकणार आहे.
– प्रो. डॉ. आरती किणीकर, सदस्य, “टास्क फोर्स’ आणि
ससूनमधील बालरुग्ण विभागाच्या प्रमुख
==================