मुंबईतील कोरोना चाचण्या 50 टक्क्यांनी घटवल्या – मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीसांचा दावा

मुंबई – राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले. राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र 50 टक्क्यांहून अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत. मुंबईत दररोज 10 हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ 3500 ते 4000 चाचण्याच होत आहेत. त्यामुळे करोना रूग्णांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, तर करोना प्रादुर्भावाला अटकाव आवश्यक आहे. असे केले तरच करोनाच्या वादळापासून आपली सुटका लवकर होणे शक्य आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे नोंदवले आहे.
फडणवीस यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, 1 मे 2020 रोजी महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांमध्ये मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे 56 टक्के होते. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक चाचण्या या करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत होत होत्या. 15 मे 2020 रोजी हे प्रमाण 40.05 टक्क्यांवर आणण्यात आले आणि आता 31 मे 2020 रोजीची आकडेवारी पाहिली तर एकूण महाराष्ट्रातील चाचण्यांच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे 27 टक्क्यांवर आले आहे.
म्हणजेच पूर्वी होणाऱ्या चाचण्यांपैकी 50 टक्क्यांहून कमी झाल्या आहेत. करोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. एकीकडे चाचण्यांची संख्या कमी होणे आणि दुसरीकडे करोनाबळींच्या संख्येने नवीन उच्चांक गाठले जात आहेत.
27 मे 2020 रोजी त्या कालखंडापर्यंतच्या सर्वाधिक 105 बळींची नोंद झाली होती. 29 मे 2020 रोजी ही संख्या 116 वर पोहोचली आणि आता 3 जून 2020 रोजी तर 122 बळी असा नवीन उच्चांक स्थापित झाला. मुंबईच्या बाबतीत विचार केला तर आतापर्यंतचे सर्वाधिक 64 बळी 30 मे रोजी गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येकी 49 बळी एकट्या मुंबईत आहेत, असे या पत्रात नमूद केले आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात कमी होत असलेल्या चाचण्या, राज्यात मृत्यूसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ तसेच मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक अथवा अन्य कारण नमूद करून अंत्यविधीसाठी मृतदेह दिले जात असल्याने निर्माण झालेले धोके याकडे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना पत्र @CMOMaharashtra pic.twitter.com/YIAPhLQ881
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 4, 2020





