- आणखी 182 बाधित
- दिवसभरात तिघांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोना चाचण्यांनी चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये आतापर्यंत चार लाख 508 नागरिकांच्या करोना चाचण्या करण्या आल्या आहेत. या चाचण्यांमध्ये 87433 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी 84125 जणांनी करोनावर मात केली.
गेल्या 24 तासांत आणखी 182 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 3 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल गुरुवारी महापालिकेला प्राप्त झाला. त्यानुसार शहरातील 173 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील 9 जणांचा करोना अहवाल सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण शहरातील रहिवाशी होते. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1526 वर पोहोचला असून शहराबाहेरील 627 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2153 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील काळेवाडी, दिघी आणि पिंपरी येथील तिघांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 84 हजार 125 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 6399 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 800 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 2154 जण महापालिकेच्या विविध रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत.