बीजिंगमधील 20 लाख नागरिकांची करोना चाचणी

बीजिंग – बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांना आता कोवळ दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र अजूनही बीजिंगमधील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. म्हणून प्रशासनाने बीजिंग शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील तब्बल 20 लाख नागरिकांच्या करोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
परदेशांमधून येणाऱ्या पत्रांत्या माध्यमातूनही करोनाच्या विषाणूंचा संसर्ग होऊ शकत असल्यामुळे आता या पत्रांनाही निर्जंतुक करण्यात यावे, असा फतवा बीजिंग टपाल खात्याने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काढला आहे.
चीनमध्ये करोनाची साथ सर्वात पहिल्यांदा सुरू झाली होती. आता ओमायक्रॉनची साथ देखील चीनमध्ये वाढायला लागली आहे. ओमायक्रॉनच्या साथीनंतर जगभरातील अनेक देशांमधील निर्बंध हळूहळू कमी केले जाऊ लागले असताना आता चीनमध्ये नव्याने निर्बंध लावायला सुरुवात झाली आहे.
“झिरो कोविड’ धोरणांतर्गत आता व्यापक चाचण्या आणि कठोर निर्बंध लावले जाऊ लागले आहेत. या धोरणाचाच भाग म्हणून आजपासून बीजिंग आणि आजूबाजूच्या परिसरातील 20 लाख नागरिकांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.





