पुणे – भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर) करोना विषाणू चाचणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) यांच्या मार्गदर्शनाखाली करोना चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, तशी चाचणी करण्यास सुरू झाली आहे.
“आयसर’मधील करोना चाचणी केंद्रातील यंत्रणा, कार्यपद्धती, सुविधा आदींची पडताळणी “एएफएमसी’ आणि “एनआयव्ही’कडून करण्यात आल्यानंतर भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) या केंद्रात चाचण्या सुरू करण्यास मान्यता दिली. या केंद्रात शासकीय रुग्णालयांमधून रुग्णांच्या घसा आणि नाकातून घेतलेले स्रावाचे नमुने येण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे आणि परिसरात जास्तीत जास्त चाचण्यांची गरज लक्षात घेऊन संस्थेतील काही वैज्ञानिकांनी “आयसीएमआर’च्या निकषांचे पालन करून अल्प कालावधीत संस्थेच्या आवारात चाचणी केंद्राची सुविधा विकसित केली आहे. या केंद्रातील सर्वांना चाचण्यांसाठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी “एनआयव्ही’ आणि “एएफएमसी’ने सहकार्य केले आहे.
चाचणी केंद्रात आयसरमधील शास्त्रज्ञ, विद्यार्थी, तांत्रिक कर्मचारी आणि अन्य स्वयंसेवकांचा समावेश आहे. चाचण्यांच्या तपशीलाच्या दस्तावेजीकरणासाठी शास्त्रज्ञ संगणकीय प्रणाली विकसित करत आहेत, अशी माहिती आयसरचे संचालक प्रा. जयंत उदगावकर यांनी दिली.