खासदार गिरीश बापट यांची मागणी
पुणे – सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात करोनाचे रुग्ण वाढत असून इतर रोगांवर उपचार घेणाऱ्या नागरिकांना लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा खासदार गिरीश बापट यांनी स्थानिक लष्करी प्रशासनाच्या प्रतिनिधींकडे केली आहे.
या संदर्भात लष्करी प्रशासन, तसेच केंद्र सरकारशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोर्डाने केलेल्या नियोजनाचा आढावा खासदार बापट यांनी शुक्रवारी घेतला.
या वेळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर कुलजीत सिंह, उपाध्यक्ष विवेक यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार उपस्थित होते. दरम्यान, लष्कराच्या रुग्णालयात करोना उपचाराबाबत कॅंटोन्मेंटसह कोणत्याही प्राधिकरणाने अद्याप अधिकृत विनंती केली नसल्याचे बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर कुलजीत सिंह यांनी सांगितले.