सोहळा अद्याप रद्द नाही; ऍड. गोपाळ गोसावी यांची माहिती
सासवड – करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सोपानकाका पालखी सोहळ्याबाबतचा प्रस्ताव येथील संतश्रेष्ठ श्री सोपान महाराज देवस्थानकडून शासनाला पाठविला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. याबाबत अंतिम निर्णय दि. 29 रोजी बैठकीत होईल, अशी माहिती ऍड. गोपाळ गोसावी व सोपानदेव पालखी सोहळा प्रमुख श्रीकांत गोसावी यांनी दिली. हा सोहळा रद्द झाला नाही, याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावात प्रमुख तपशील पुढीलप्रमाणे- सोहळ्यातील उपस्थितांची संख्या 20 असेल. यात प्रमुख मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी, चोपदार यांचा समावेश असणार आहे. ज्येष्ठ वद्य द्वादशी (दि. 18) जून रोजी सासवडमधून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यात येईल; देवाच्या पादुका आषाढ शुद्ध दशमीपर्यंत सासवड येथील मंदिरातच ठेवण्यात येतील.
30 जून रोजी दुपारी 12 वाजता सासवडहून चारचाकी वाहनाने पंढरपूरकडे प्रस्थान होईल. राज्य शासनाने बससेवा उपलब्ध करून द्यावी. चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, गोपाळपूर काल्याचा प्रसाद, श्री विठ्ठल मंदिरात दर्शन आदी कार्यक्रम एकादशी ते पौर्णिमा या काळात होतील.