बारामती – बारामती शहरासह तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी करोना संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,
असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. 10) केले. तसेच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहुन योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,
पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे
डॉ. सुनिल दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्वलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
बारामती शहरासह तालुक्यातील करोना, म्युकरमायकोसीस संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
तसेच टाटा ट्रस्ट मुंबई यांच्याकडून 15 कॉन्सट्रेटर देण्यात आले त्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी डॉ. संतोष भोसले, प्रशासकीय व वैद्यकीय अधिकरी उपस्थित होते.
ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूना शुभेच्छा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे आणि शुभेच्छा बॅनरचे उद्घाटन क्रीडा संकुल,
बारामती येथे करून खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके मिळवावीत व देशाचे नाव उंच करावे यासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले. यावेळी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.