वॉशिंग्टन : करोना विषाणूचा संसर्ग जागतिक अर्थव्यवस्थेसमोरचं गंभीर संकट असून, त्याविरोधात निकराचा लढा द्यायला हवा असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालीना जॉर्जीएव्हा यांनी म्हटले आहे त्या काल वॉशिंग्टन इथे बातमीदारांशी बोलत होत्या. कोविड-19 या आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मागच्या वर्षीच्या तुलनेत 2.9 टक्क्यांनी मंदावली असल्याची माहितीही त्यांनी दिली. या आजाराचा संसर्ग ही आता केवळ कोणत्याही एका प्रदेशाची नाही तर संपूर्ण जगाची समस्या असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीन मधले उत्पादन निम्म्या पेक्षा खाली आल्याने पुढील महिन्यात जगातली निर्यात 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सनं खाली येईल, असे अर्थतज्ञांचे मत आहे. या निर्यातघटीमुळे जपान, अमेरिका, युरोपीय महासंघाच्या व्यापाराला याचा जास्त फटका बसला आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार गुंतवणूक आणि विकासाच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. केवळ चीनच्या अर्थकारणालाच नव्हे तर जागतिक अर्थकारणाला याचा फटका बसला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. जगातला सगळ्यात मोठा पुस्तक मेळा म्हणून ज्याची ख्याती आहे तो लंडन पुस्तक मेळा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करावा लागल्याचे आयोजकांनी जाहीर केले. ऑलंपिया लंडन प्रदर्शन आणि परिषद सभागृहात या महिन्याच्या 10 ते 12 तारखेपर्यंत या मेळ्याचे आयोजन केले होते. जागतिक दर्जाचे प्रकाशक या मेळ्यात सहभागी होतात. या निर्णयामुळे सर्वजण नाराज झाल्याचे आयोजकांनी सांगितले.