पुणे – करोना प्रार्दुभावामुळे पुणे जिल्ह्यात उद्योगधंदे, रोजगार बंद आहेत. त्यामुळे चाकरमान्यांबरोबरच सर्व क्षेत्रातील लोकांना रोज घरीच बसण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीवरील मालिकांचे रोजचे भाग दाखविणे बंद करण्यात आल्याने घरातील प्रत्येक सदस्यांच्या हातात स्मार्ट फोन दिसून येत आहे. करोनामुळे घरी बसून असल्याने काही जण टीव्ही पाहण्याचा प्रयत्न करतात; मात्र, टीव्हीवर मालिका व चित्रपट पूर्वीचेच दाखवित असल्याने त्यांचा मूड ऑफ होत आहे. त्यामुळे साहजिकच स्मार्ट फोनवरील इंटरनेटच्या दुनियेत प्रत्येकाचा वावर अधिकच वाढला असल्याचे दिसून येत आहे.
इंटरनेटवर सध्या हवी ती माहिती मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत कामानिमित्त जे काही पाहता आले नाही, असे सर्व पाहण्याचा मोह अनेकांना होताना दिसून येत आहे. गृहिणींकडून पाककलेचे धडे इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. घरातल्या घरात वेळ घालविण्यासाठी आपल्या आवडीनुसार काय काम करता येईल, याची माहितीसुद्धा स्मार्ट फोनद्वारे मिळविण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे.
घरातील लहान मुलेही स्मार्ट फोनवरच आपला वेळ घालविताना दिसत आहेत. गेम्स खेळण्याचा मुलांना चांगलाच छंद असतो. प्रत्येकजण स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करत असल्यामुळे सर्व्हर डाऊन होत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे अनेक साइट धिम्या गतीने चालत आहेत. डाऊनलोडचा वेग कमी झाला आहे.