रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक; नियमांचे पालनच करणे हा उपाय
पिंपरी – सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण असलेल्या “करोना’वर पिंपरी-चिंचवड शहराने कालांतराने नियंत्रण मिळविले होते. परंतु गेल्या काही दिवसांत “करोना’ने पुन्हा एकदा उसळी घेत आपला वेग प्रचंड वाढविला आहे. “करोना’चा वाढता वेग चिंताजनक असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असल्याने स्थिती काहीशी दिलासादायक आहे. “लॉकडाऊन’च्या नियमांचे पालन केल्यास स्थिती पूर्वपदावर येऊ शकते, अशी आशा सध्याच्या उपचाराधीन रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 11 मार्च रोजी “करोना’चे संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर 12 मार्च रोजी शहरातील पहिल्या तीन रुग्णांना “करोना’ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा आकडा वाढत 12 पर्यंत गेला. 20 मार्च नंतर “करोना’ला ब्रेक लागला आणि तब्बल अकरा दिवस शहरात एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान पूर्वीचे रुग्ण बरे होऊन घरी परतत होते. आता शहर “करोनामुक्त’ होईल, असे वाटत असतानाच 31 मार्च रोजी दिल्ली येथील तबलिगी जमातच्या मरकजवरुन आलेल्या नागरिकांना “करोना’ची बाधा झाली असल्याचे आढळून आले. त्यानंतर सातत्याने रोज “करोना’चे रुग्ण आढळू लागले आणि शनिवार दि. 9 मे रात्रीपर्यंत “करोना’ने 167चा आकडा ओलंडला.
‘करोना’चे रुग्ण सातत्याने आढळत आहेत, परंतु पिंपरी-चिंचवड शहरापासून अगदी जवळ असलेल्या पुण्याच्या आणि मुंबईच्या तुलनेत शहरातील रुग्णांचे प्रमाण खूपच कमी वाटत आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांमध्ये “करोना’ने आपला वेग प्रचंड वाढविला असल्याचे दिसून येत आहे.
असे वाढले रुग्ण
12 मार्च रोजी शहरात पहिल्या तीन रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली. हा आकडा पन्नासच्या पुढे जाण्यासाठी तब्बल सहा आठवडे लागले. 16 एप्रिल रोजी शहरातील एकूण “करोनाबाधितां’चा आकडा 51 वर जाऊन पोहचला होता. त्यानंतर दीड आठवड्यातच म्हणजे 27 एप्रिल रोजी “करोना’ने दुसरे अर्धशतक पूर्ण करत शंभरी गाठली. अवघ्या नऊ दिवसांत “करोना’ने तिसरे अर्धशतक पूर्ण करत एकूण “करोनाबाधितां’चा आकडा 153 वर नेऊन पोहचविला. त्यानंतरच्या तीन दिवसांत आणखी 15 रुग्णांची भर पडत “करोना’च्या रुग्णांचा आकडा 168 वर पोहचला.
हे दिवस ठरले धक्कादायक
शहरातील “करोना’चे रुग्ण वाढविण्यासाठी दोन महिन्यांच्या काळात सहा दिवस खूपच धक्कादायक ठरले. या दिवशी “करोना’च्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.