वडूज – मुंबईतून वडूज, ता. खटाव नजीक सातेवाडी येथे आलेल्या 75 वर्षांच्या महिलेचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सातेवाडी व वडूज शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईतून गुरसाळे, ता. खटाव येथे आलेल्या 75 वर्षांच्या पुरुषाचा घरीच मृत्यू झाला होता. त्याचा मृत्युपश्चात करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मुंबईतून चार जण सातेवाडीत आले होते. मुंबईवरून येताना शिरवळ येथेच त्या चौघांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील 75 वर्षांच्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने बाधित महिलेला पुढील उपचारासाठी मायणी येथील कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केले आहे. तिच्याबरोबर आलेल्या तिघांना आणि ते ज्या घरात क्वारंटाइन होते, त्या घरातील दोन महिलांना मायणीत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
गुरसाळे, ता. खटाव येथे पंधरा दिवसांपूर्वी मुंबईतून आलेले कुटुंब होम क्वारंटाइन होते. या कुटुंबातील 75 वर्षांच्या वृद्धास बुधवारी (दि. 3) दुपारपासून त्रास होऊ लागला. त्याच्यावर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक उपचार करून सातारा येथील जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, रुग्णाची प्रकृती पाहून कुटुंबीयांनी त्याला घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्या रुग्णास पक्षाघात व अन्य आजार होते. त्यातच त्याचा घरी मृत्यू झाला.
मृत्युपश्चात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सात जणांना मायणी येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांनी सातेवाडी-वडूज हद्दीत व गुरसाळे येथे तात्काळ भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व रस्ते सील केले आहेत. वडूज शहर बफर झोनमध्ये असल्याने तेथे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.