“करोना महामारी,निंदनीय कामगिरी…पंतप्रधान मोदी जगात भारी”; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला

मुंबई : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण अवस्था बिकट करून टाकली आहे. आरोग्य सुविधांअभावी रुग्णांना जीव गमवावे लागत आहेत. भारतात निर्माण झालेल्या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारवर टीका होत आहे.
जगभरात पसरलेल्या करोना महामारीचा कोणत्या नेतृत्वाने नीट मुकाबला केला. यासंदर्भात ‘द कॉन्व्हर्सेशन’ या वेबसाईटने एक जनमत चाचणी घेतली होती. या चाचणीत निघालेल्या निष्कर्षावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल अमेरिकेमधील ‘द कॉनव्हर्सेशन’ या वेबसाईटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली होती. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. या ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या जनमत चाचणीतील समोर आलेल्या कलावरून राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
अमेरिकेतील 'द कॉन्व्हर्सेशन' वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली. pic.twitter.com/GSlGQPOwmC
— NCP (@NCPspeaks) May 22, 2021
“अमेरिकेतील ‘द कॉन्व्हर्सेशन’ वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. करोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजले. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली.
काही दिवसांपूर्वी ‘द डेली गार्डियन’ या लोकल वृत्तपत्राला ग्लोबल भासवून मोदी कसे चांगले काम करतात, हे दाखवायचा प्रयत्न भाजपाने केला. त्या तुलनेत ‘द कॉन्व्हर्सेशन’ हे वृत्तपत्र मोठं आहे. त्यामुळे दखल घेणं क्रमप्राप्त ठरते. या चाचणीत अव्वल आलेल्यांना शुभेच्छा!,” असे म्हणत “करोना महामारी निंदनीय कामगिरी पंतप्रधान मोदी जगात भारी” असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डागले आहे.





