एका दिवसात 1303 बाधित : 9 रुग्णांचा मृत्यू पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोना पुन्हा एकदा खूपच घातक वळणावर येऊन पोहचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये शहरातील 1296 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 7 अशा एकूण 1303 जणांना करोनाची लागण झाली आहे. एवढेच नव्हे तर करोनाने गेल्या 24 तासांमध्ये 9 रुग्णांचा बळी घेतला आहे. यात शहरातील पाच आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या चार रुग्णांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांमध्ये शहरात 1296 नवीन करोना रुग्ण आढळल्याने आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 18 हजार 192 इतकी झाली आहे. तसेच गुरुवारी 406 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्त रुग्णांची संख्या 1 लाख 7 हजार 502 इतकी झाली आहे. रोज करोना मागील उच्चांक मोडत नवा उच्चांक स्थापित करत असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. शहरात शुक्रवारी उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या तब्बल 8797 इतकी झाली आहे. त्यापैकी केवळ 1886 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत असून 6911 रुग्ण हे घरात राहूनच उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये करोनामुळे झालेल्या 9 मृत्यूमुळे आतापर्यंत शहरातील करोना मृत्यूंचा आकडा 2689 झाला आहे. यात शहरातील 1893 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 796 इतकी झाली आहे. बाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण धक्कादायक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णांलयामध्ये गेल्या एक वर्षांमध्ये शहराबाहेरील 9081 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. यापैकी बहुतेक रुग्ण हे खेड, जुन्नर, आंबेगाव आणि पुणे शहरातील आहेत. त्यापैकी 796 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यानुसार शहराबाहेरील रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी 8.76 टक्के इतकी झाली आहे. खूप उशिरा आणि अत्यवस्थ झाल्यानंतर उपचारासाठी दाखल होणाऱ्या या रुग्णांना करोनामुक्त करण्यासाठी महापालिकेचे डॉक्टर आणि नर्स खूप परिश्रम घेत आहेत. परंतु उशिरा निदान आणि उपचारांमध्ये झालेला उशीर त्यांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही अद्यावत वैद्यकीय सेवा सुविधा नसल्याचा मोठा फटका ग्रामीण रुग्णांना बसत आहे. सर्वाधिक रुग्ण ड प्रभागात उच्चभ्रू परिसर असलेल्या ड प्रभागात सातत्याने सर्वाधिक करोना रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी देखील या प्रभागातून 238 करोनाबाधित आढळले आहेत. त्यापाठोपाठ ब प्रभागात 233 रुग्ण आहेत. सर्वांत कमी रुग्ण क प्रभागात असून त्यांचा आकडाही 134 इतका आहे. महापालिकेच्या रुग्णालय झोननुसार तालेरा रुग्णालयांतर्गत येणाऱ्या परिसरात गुरुवारी 216 रुग्ण आढळून आले. लसीकरणाने ओलांडला 80 हजारांचा टप्पा शहराने करोना प्रतिबंधक लसीकरणाचा 80 हजारांचा टप्पा गुरुवारी ओलांडला आहे. गुरुवारी एकूण 4084 नागरिकांना लस देण्यात आली यामुळे आतापर्यंतचे एकूण लसीकरण 80897 इतके झाले आहे. त्यापैकी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये 60954 लसीकरण करण्यात आले. उर्वरित लसीकरण खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात आले आहे.