करोनाच्या दुष्परिणामांची सध्या जगभर चर्चा सुरू असतानाच यावरूनही अमेरिका आणि चीन यांच्यात जे राजकारण सुरू आहे त्या बातम्यांनी मात्र मोठीच अस्वस्थता निर्माण केली आहे. या दोन्ही बलाढ्य राष्ट्रांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्याच्या नादात साऱ्या जगाला वेठीला धरले आहे. ही जागतिक समस्या असताना त्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची बैठकसुद्धा या दोन राष्ट्रांच्या राजकारणामुळे रखडली होती. ही बैठक घेण्यालाच चीनने विरोध केला.
ही बैठक झालीच तर त्यात कोणताही ठराव न करण्याची भूमिका चीनने घेतली. त्या उलट चीनमुळे हा विषाणू जगभर पसरला याबद्दल चीनचा निषेध करणारा ठराव या बैठकीत संमत केला जावा अशी मागणी अमेरिकेने केली होती. म्हणून चीनने ही बैठकच होऊ दिली नव्हती. पण परवा संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांच्या पुढाकाराने सुरक्षा मंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक झाली. पण तीही केवळ एक औपचारिकताच ठरली. कारण त्यात केवळ जुजबी चर्चा झाली आणि विषय संपवण्यात आला. ना कोणता ठराव त्यात झाला ना करोनाच्या आव्हानाचा मुकाबला नेमका कसा करायचा यावर कोणतीही रूपरेषा ठरवण्यात आली.
चीनने करोना प्रसाराच्या संबंधातील माहितीही लपवून ठेवली त्यात कोणतीही पारदर्शकता बाळगली नाही, या रोगाने तेथे नेमके किती लोक बाधित झाले याचीही खोटीच आकडेवारी चीनकडून देण्यात आल्याचा दावा या बैठकीत अमेरिकेच्या प्रतिनिधिंनी केला. त्याला अर्थातच चीननेही आक्षेप घेतला. पण यावेळी चीनने अमेरिकेवर कोणतेही नवीन आरोप न करता या जागतिक आव्हानाचा मुकाबला आपण संघटितपणे केला पाहिजे अशी समजुतीची भूमिका मांडली. पण हा विषाणू नेमका कोठून प्रसारित झाला याचा तपशील चीनने द्यावा यावर अमेरिका अडून राहिली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील वादात जागतिक आरोग्य संघटनेलाही ओढण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटना ही चीन धार्जिणी असल्याने या संघटनेला दिला जाणारा निधीच रोखून धरण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. जर असे झाले तर या संघटनेला गाशाच गुंडाळावा लागणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील वादात मधल्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा बळी जातोय की काय अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. तैवान या देशाने गेल्या डिसेंबर महिन्यात करोना विषाणूबद्दल जागरूकता बाळगण्याची सूचना करणारे पत्र जागतिक आरोग्य संघटनेला पाठवले होते. पण चीनच्या दबावामुळे या संघटनेने त्या पत्राची दखलच घेतली नाही.
या रोगाच्या प्रसाराबद्दल जगाला सावध करण्याची तसेच त्याविषयी माहिती देण्याची जबाबदारी जागतिक आरोग्य संघटनेची होती; पण या संघटनेचे अध्यक्ष चीनच्या दबावाखाली असल्याने त्यांनी जगाला ही माहिती दिली नाही असा अमेरिकेचा आरोप आहे. मुळात करोना पसरला कोठून यावरूनही या दोन देशांमध्ये मोठा वाद आहे. कोव्हिड- 19 हा चिनी व्हायरस आहे आणि तो चीनमधूनच साऱ्या जगभर पसरल्याने त्याबद्दल चीनकडून नुकसानभरपाई घ्यावी किंवा त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई करावी अशी अमेरिकेची मागणी आहे. पण चीनला मात्र हा आरोप मान्य नाही, आपल्या देशातून हा विषाणू पसरलेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. या विषाणूचा प्रसार अमेरिकन लष्करातून झाला आणि तो अमेरिकेतून वुहानमध्ये आला असे चीनचे म्हणणे आहे.
चीन आणि अमेरिका यांच्यातील हा वाद इतक्यात संपण्याची शक्यता नाही. ही दोन्ही बलाढ्य राष्ट्रे एकमेकांचा नायनाट करण्यात व्यस्त आहेत. आधीच त्यांच्यातील व्यापार युद्धाने जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठे तडाखे बसले आहेत. आता त्यांच्यातील या आर्थिक स्वरूपाच्या कुरघोड्या आणखीनच तीव्र होत जाणार आहेत. अमेरिकेने या वातावरणाचा लाभ घेत चीनच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आता अमेरिकेतील चिनी दूरसंचार कंपन्यांना गाशा गुंडाळायला लावण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेच्या संरक्षण, गृह आणि विदेश विभागांनी चिनी दूरसंचार कंपन्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने त्यांना अमेरिकेत बंदी घालावी अशी शिफारस ट्रम्प प्रशासनाकडे केली आहे आणि ट्रम्प यांनी तशी तयारी आता सुरू केली आहे.
एकमेकांवरील कुरघोड्यांची ही मालिका आता रोज नवनवीन वळणे घेत जाणार आहे आणि त्यातून सारे जग पुन्हा वेठीला धरले जाणार आहे. वास्तविक अमेरिका आणि चीनसह जगभरातील 186 देशांना करोनाचा फटका बसला असून जवळपास सारे जगच आज लॉकडाऊनच्या अवस्थेत आहे. त्यातून जागतिक अर्थव्यवस्था पार उद्ध्वस्त होणार असून यापुढील जागतिक राजकारणाचे सारेच संदर्भ बदलणार आहेत. अशा स्थितीत जगातल्या बड्या आणि समजूतदार राष्ट्रांनी जगावर आलेल्या या आर्थिक आरिष्ट्यातून बाहेर पडण्यासाठी एकमेकांच्या समन्वयाने काम करणे अपेक्षित असताना या दोन राष्ट्रांनी अशा भीषण स्थितीतही एकमेकांवर ज्या कुरघोड्या चालवल्या आहेत त्यातूनच जगाचे अधिक नुकसान होणार आहे. या दोन राष्ट्रांमधील कुरघोड्या या त्यांच्या पातळीवरच मर्यादित राहत नसतात.
हे देश जगातील आपल्या अन्य मित्र राष्ट्रांनाही त्यात ओढून त्याची व्याप्ती वाढवत असतात. त्यामुळे सारे जगच पुन्हा यातून पोळणार आहे हे चित्र स्पष्ट दिसते आहे. चीनने या संधीचा उपयोग करून घेऊन जगावर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याची पद्धतशीर खेळी सुरू केली आहे असेही सांगितले जात आहे. त्यांनी जगातल्या शंभर करोना बाधित राष्ट्रांना मदत पुरवण्याचे काम हाती घेतले आहे. यात आर्थिक मदतीसह वैद्यकीय साधनसामग्रीची मदत आणि करोना नियंत्रणात आणण्याच्या आपल्या कामाचा अनुभव त्यांनी या राष्ट्रांना देण्याचे ठरवले आहे. त्यांची ही मदत केवळ मानवतावादी भूमिकेतूनच आहे असा भाबडेपणा कोणी करणार नाही.
चीनने भारतातील एचडीएफसी बॅंकेच्या शेअर्सचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याची बातमी कालच प्रसारित झाली आहे. त्यालाही अनेक परिमाणे आहेत. करोनामुळे डबघाईला आलेल्या भारतातील उद्योग क्षेत्र आपल्या नियंत्रणाखाली घेण्याच्या त्यांच्या डावाची ही सुरुवात आहे असेही मानले जात आहे. करोनाच्या संकटातही संधी शोधली पाहिजे असे जे सांगितले जात आहे, ती संधी शोधण्याचे काम अमेरिका आणि चीन यांनी सुरू केले असेल तर ते जगालाच महागात पडू शकते. या दोन्ही राष्ट्रांनी या संकटाच्या घडीला जबाबदारीच्या वर्तनाचे दर्शन घडवावे अशी अपेक्षा आहे.