Corona : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार ? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या…

मुंबई – देशासह राज्यात करोनाची तिसरी लाट सुरू असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. राज्यात शनिवारी 27 हजार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. या परीक्षा पुढे ढकलणार अशी चर्चा असताना यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मत व्यक्त केलं आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं, आम्ही पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. 15 फेब्रुवारीपर्यंत परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, पुरवणी परीक्षा असते.
दरम्यान कोविड परिस्थितीमुळे जे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत त्यांना पुरवणी परीक्षेत बसवाव लागतं. अशा एकावर एक अवलंबून गोष्टी असतात. त्यानंतर अकरावीचे प्रवेश असतात. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तो विचारपूर्व घेतला पाहिजे. आम्ही शैक्षणिक बोर्डासोबत चर्चा करत आहोत, अभ्यासक्रमाच्या संदर्भातही चर्चा करत आहोत, असंही गायकवाड यांनी म्हटलं.
त्याचवेळी परीक्षा नियमित वेळेनुसार आणि ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. तत्पूर्वी राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्या होत्या. आता यावर शिक्षणमंत्री आणि शिक्षक विभाग काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.




