कोरोना व्हायरसचे थैमान: चीनमधील गुगलची सर्व कार्यालये बंद

नवी दिल्ली : चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसने चांगलेच थैमान घातले आहे. या व्हायसरमुळे जगभरात सध्या भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जगातील अग्रगण्य टेक कंपनी गुगलने चीनमधील आपली सर्व कार्यालये काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे वाढता धोका लक्षात घेऊन कंपनीने सर्व कार्यालये तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. गुगलची हॉंगकॉंग, तैवान आणि मेनलॅंड चाइनामधील सर्व कार्यालये बंद असणार आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनमधील सरकारने नागरीकांना प्रवास टाळण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या सूचनेनुसार कंपनीने सर्व कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे गुगलच्या प्रवक्‍त्याने The Verge सोबत बोलताना सांगितले. याशिवाय कर्मचाऱ्यांना 14 दिवस घरुन काम करण्याची मूभाही देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले असून तेथे आतापर्यंत एकूण 130 हून अधिक जणांना मृत्यू झालाय. मध्य हुबेई प्रांतात एकाच दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, विषाणूची लागण झालेल्या निश्‍चित रुग्णांची संख्या आता सहा हजार झाली असून पुढील दहा दिवसांत चीनमधील परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्‍यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चीनच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी 5974 रुग्णांच्या चाचण्या सकारात्मक आल्याचे म्हटले असून त्यांना कोरोना विषाणूने न्यूमोनिया झाला आहे. मंगळवारी एकूण 31 प्रांतांत या विषाणूचा प्रसार झाल्याचे दिसून आले. एकूण 132 लोकांचा यात बळी गेला असून हुबेई प्रांतात 3554 निश्‍चित रुग्ण आहेत. वुहान ही या प्रांताची राजधानी आहे. या प्रांतात एकूण 125 बळी गेले आहेत. 1239 रुग्ण गंभीर स्थितीत असून एकूण 9239 संशयित रुग्ण आहेत. हुबेई प्रांतात 840 नवे रुग्ण सापडले असून विषाणू खूप वेगाने पसरत चालला आहे. जे लोक यात मरण पावले ते साठ वयावरचे आहेत. त्यांना आधीपासून इतरही काही रोग होते. मानवी संपर्कातूनही हा विषाणू पसरत असून या विषाणूचा प्रादुर्भाव दहा दिवसांत जास्त वाढणार असल्याचा इशारा श्वसन रोग तज्ज्ञ झोंग नानशान यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.