दिल्लीतील कॉलेजला वीर सावरकरांचे नाव देण्याच्या प्रस्तावावरून वाद; नेमकं काय आहे प्रकरण?

Veer Savarkar College | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या (DU) दोन नव्या कॅम्पस आणि कॉलेजचं भूमिपूजन केले. यात वीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय बांधण्याचाही प्रस्ताव केला आहे. या नव्या कॉलेजला वीर सावरकर यांचं नाव देण्यात येणार असल्याचे समोर आल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
हे कॉलेज तीन मोठ्या प्रकल्पांचा एक भाग आहे, जे डीयूला नवीन उंचीवर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामध्ये सूरजमल विहार येथील इस्टर्न कॅम्पस, द्वारका येथील वेस्टर्न कॅम्पस आणि वीर सावरकर कॉलेज यांचा समावेश आहे. या प्रकल्पांची एकूण गुंतवणूक 600 कोटींहून अधिक आहे.
पूर्व कॅम्पस
दिल्ली विद्यापीठाचे पूर्व कॅम्पस सूरजमल विहारमध्ये बांधले जाणार आहे. ते अंदाजे 15.25 एकर असेल. या प्रकल्पासाठी 373 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. या कॅम्पसमध्ये एलएलबी, एलएलएम आणि पाच वर्षांच्या एकात्मिक एलएलबी प्रोग्रामसह इतर अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असतील. ५९,६१८ चौरस मीटरच्या या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी ६० वर्गखोल्या, १० ट्यूटोरियल रूम, सहा मूट कोर्ट, चार कॉम्प्युटर लॅब, दोन कॅफेटेरिया आणि दोन कॉमन रूम अशा अनेक सुविधा उपलब्ध असतील. Veer Savarkar College |
वेस्टर्न कॅम्पस
दिल्ली विद्यापीठाचा वेस्टर्न कॅम्पस द्वारका सेक्टर 22 मध्ये बांधण्यात येणार आहे. या कॅम्पसच्या शैक्षणिक इमारतीसाठी अंदाजे 107 कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे. 19,434.28 चौरस मीटरमध्ये बांधण्यात येणाऱ्या या संकुलात एकूण 42 वर्गखोल्या, दोन मूट कोर्ट, डिजिटल लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, फॅकल्टी रूम, कॅफेटेरिया, कॉमन रूम आणि सेमिनार हॉल इत्यादी असतील. याशिवाय मुला-मुलींसाठी इतरही अनेक सुविधा उपलब्ध असतील.
वीर सावरकर महाविद्यालयाचा एकुण खर्च?
तसेच दिल्ली विद्यापीठाचे वीर सावरकर महाविद्यालय नजफगडमध्ये बांधले जाणार आहे. पश्चिम कॅम्पसपासून या कॉलेजचे अंतर अवघे पाच मिनिटांचे आहे. हे UER महामार्गाच्या अगदी जवळ आहे. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी अंदाजे 140 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. या 18,816.56 चौरस मीटर कॉलेज कॅम्पसमध्ये 24 वर्गखोल्या, 8 ट्युटोरियल रूम, एक कॅन्टीन आणि 40 फॅकल्टी रूम, लायब्ररी आणि कॉन्फरन्स रूम इत्यादी सुविधा असतील. Veer Savarkar College |
का होतोय वाद ?
सावरकरांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या या महाविद्यालयावरून राजकारण सुरू झाले आहे. याबाबत एनएसयूआयने निषेध व्यक्त केला आहे. कॉलेजला वीर सावरकरांऐवजी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे नाव द्यावे, अशी मागणी काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) करत आहे.
काँग्रेस युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वरूण चौधरी यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्यात मनमोहन सिंग यांनी शिक्षण आणि प्रशासन यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची आठवण करून दिली आहे. मनमोहन सिंग यांची शैक्षणिक पार्श्वभूमी मोठी आहे. त्यांच्या कारकिर्दीत राईट टू एज्युकेशन एक्ट आणि सेंट्रल यूनिवर्सिटी एक्ट आणले गेले. त्यामुळे नव्या कॉलेजला त्यांचे नाव देणे त्यांच्यासाठी मोठी श्रद्धांजली ठरे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता सावरकर यांच्या कॉलेजवरील नावावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.





