Uday Samant : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील एका बड्या नेत्याने केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. “मिरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय होणार, उत्तर भारतीय महापौर होईल इतके नगरसेवक निवडून आणू,” असे वादग्रस्त विधान भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याशिवाय त्यांनी राज्यातील २९ महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, असा दावा देखील केला आहे. त्यांनी केलेल्या विधानावरून शिवसेना शिंदे यांच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कृपाशंकर काही महायुतीचे धोरण ठरवत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धोरण ठरवतील,” या शब्दांत कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या विधानावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कृपाशंकर सिंह हे भाजपचे मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा आहेत. पण त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीचे विधान केल्याने मराठी माणसांची मने दुखावली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी मराठी माणसावरून राजकारण करणाऱ्यांना मराठी जागा कुठेही मिळाल्या नाहीत. तिथेपण ठाकरे हेच लढत आहेत. आमच्याकडे कुठेही बंडखोरी झालेली नाही. युती कुठेही तुटलेली नाही. मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, वसई-विरार युती झाली आहे, याबद्दल देखील तुम्ही बोलले पाहिजे अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. याआधीही केले होते वादग्रस्त विधान भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. खरंतर त्यांची अशा प्रकारे विधान करण्याची पहिलीच वेळ नाही. याअगोदर त्यांनी मे महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी विरोधी केलेल्या विधानानंतर त्याला प्रत्यत्तर म्हणून “हिंदी माझी आई, तर मराठी माझी मावशी” असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून देखील मोठा वाद पेटला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान करून विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे. हेही वाचा : आता प्रचाराचा धुरळा! CM फडणवीस स्वतः मैदानात उतरणार; महापालिका निवडणुकीसाठी घेणार ‘इतक्या’ सभा