Navneet Rana : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार १ डिसेंबरला रात्री १० वाजता थांबणार आहे. तत्पूर्वी प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्याने नेते मंडळी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार सभा गाजवत आहेत. या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा मैदानात उतरल्या आहेत. एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या ‘बटेंगे तो कटेगे’चा नारा पुन्हा दिला आहे. तसेच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना देखील त्यांनी थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. तसेच त्यांनी पुरुषाबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

राहुल गांधींनी संविधानाचे पुस्तक हाती न घेता संविधानातील कलमं सांगून दाखवावी, असे थेट आव्हान नवनीत राणा यांनी जाहीर सभेतून दिले आहे. असं राहुल गांधींनी केलं तर आपण राजकारण सोडू, असे देखील त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांनी राहुल गांधींना दिलेल्या थेट आव्हानावर काँग्रेस पक्षातील नेत्यांची काय प्रतिक्रिया समोर येते, हे पाहावे लागणार आहे. ‘इसबार ना कटना है, ना बटना है’… ‘एक रहेना और सेफ भी रहेना है’. हे ताकद दाखवतायेत, आता आपल्यालाही ताकद दाखवायची असल्याचे देखील नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

नवनीत राणांचं मोठं विधान

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘किसीसे भी लढना लेकिन रामजी के साथ मत लढना’. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानते. दरम्यान, बाकी कुणाला मी मोजणारी नाही, असे किती आले आणि गेले. किती येतील आणि जातील. जर पाकिस्तानने राम मंदिराकडं बोट दाखवले तर त्यांची बोटं कापून टाकणार, असे मोठं विधानही नवनीत राणा यांनी केले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या.

पुरुषाबद्दल वादग्रस्त वक्तव्य

या जाहीर सभेतून नवनीत राणा यांनी पुरुषाबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “नगरपरिषद निवडणुका सुरु आहे. आता खूप पार्ट्या, कार्यक्रम होणार आहे. पुरुष मतदार हा अनेक पार्ट्यांमध्ये जातो आणि रात्री 2 वाजता घरी परततो. मात्र, या तुलनेत महिला मतदार खूप इमानदार आणि एकनिष्ठ राहतात. कारण, बायका कधीही कुणाच्या पैशाला बळी पडत नाही आणि कधीही कुणाच्या पार्टीत न जाण्याची त्यांची भूमिका राहते. ‘ती’ चटणी भाकर खाणार, पण शेवटच्या श्वासापर्यंत घराला घर बनवणार,” असे त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रवी राणांचा गौप्यस्फोट

दरम्यान, नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी पत्नीच्या पराभवाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. नवनीत राणांचा पराभव झाल्यामुळे अमरावती जिल्ह्याचे काय हाल झाले हे सर्वांना माहीत आहे. आताच्या खासदाराचा अत्ता, पत्ता नाही. विकासाचा पत्ता नाही आहे, काम करणारी महिला खासदार नवनीत राणा तुमच्या आशीर्वादाने लढत होती. पण जातीपातीच्या राजकारणामुळे तिचा पराभव झाला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराचा पराभव झाला आणि दारूचा दुकान असलेला व्यक्ती निवडून आला, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

हेही वाचा : Satara : उत्तरे देण्याची धमक असेल, तर गांधी चौकात या; रहिमतपूरमधील सभेत सुनील माने यांचे विरोधकांना जाहीर आव्हान