पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीने खरेदी केलेल्या पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क येथील ४० एकर महार वतन जमिनीचा वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. अजित पवार यांनी स्वतः याची माहिती देताना सांगितले की, “हा व्यवहार रद्द झाला आहे. मी तीन-चार महिने आधीच सांगितले होते की असले प्रकार चालणार नाहीत. मला याची माहिती नव्हती, असती तर लगेच थांबवले असते. चौकशीत कुणाचे फोन गेले, कोणी मदत केली, सगळं समोर येईल.” असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले, “मी आजपर्यंत नियम तोडून काम केले नाही. २००९-१० च्या आरोपांनाही क्लीन चिट मिळाली. विरोधक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, पण मी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून सांगितले की, जे नियमाप्रमाणे करायचे ते करा, मला पाठिंबा आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, एक महिन्यात अहवाल येईल. व्यवहारात एक रुपयाही दिला गेला नाही, मोठे आकडे फक्त चर्चेत होते.” कोरेगाव जमीन व्यवहारात मला अजिबात काही माहिती नव्हती. मला माहिती असतं तर लगेच सांगितलं असतं. पण साहजिकच विरोधक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामध्ये दुमत नाही. मात्र, मला आजच माहिती मिळाली की, याप्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. पुढील 1 महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कोरेगाव जमीन व्यवहारावर बोलताना अजित पवार म्हणाले की, या व्यवहारात चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे ठरवले. पण ते नागपूरला होते. त्यामुळे मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यांना मी सांगितले की, जरी माझ्या घरातल्या जवळच्यांचा विषय असला, तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. त्यामुळे तुम्हाला जे काही नियमाप्रमाणं करावं लागेल, चौकशी करावी लागेल, समिती नेमायची असेल ते करा, माझा त्या गोष्टीला पाठिंबा राहील. आरोपातील वस्तूस्थिती जनतेला कळणं आवश्यक असते. कारण या व्यवहारात एक रुपया देखील दिला गेलेला नाही. मोठे आकडे सांगितले गेले, गोष्टी सांगितल्या गेल्या, परंतु मला आज जे कळालं, जो काही व्यवहार झाला होता तो रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.