नालेसफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवण्याचा विसर ः नियमांना हरताळ
पुणे – घाणीत तसेच अस्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पायात गमबुट आणि हाताला सुरक्षा अवरण घालूनच काम करणे कायद्याने बंधनकारक असताना महापालिकेचे नाले सफाई करणारे कर्मचारी कोणत्याही सुरक्षा साधनाविनाच हे काम करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाच्या बाजूलाच असलेल्या नाल्याच्या सफाईवेळी हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेने नाले सफाईचे काम दिलेले ठेकेदार कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याचे पुन्हा दिसून आले आहे.
महापालिकेकडून पावसाळा सुरू होण्यास अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना; तातडीने नाले सफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी आचारसंहिता अशत: शिथील होताच ज्या क्षेत्रीय कार्यालयांनी निविदा काढल्या आहेत, त्यांची कामे सुरू झाली असून इतर क्षेत्रीय कार्यालयांची कामे आयुक्तांच्या अधिकारात सुरू करण्यात आली आहेत. नाले सफाईची कामे करताना ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या आरोग्य तसेच सुरक्षा साधने देण्यात येत नसल्याचे समोर आले आहे.
दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांचा बंगला असलेल्या चित्तरंजन वाटीका परिसरातील नाल्याची सफाई सुरू असताना, हे कर्मचारी कोणत्याही सुरक्षा साधनाविना नाल्यात उतरले असल्याचे दिसून आले. तसेच, ड्रेनेज आणि नालेसफाई करताना त्यांना हातात ग्लोज आणि गरमबुट असणे आवश्यक होते. मात्र, हे कोणतेही साहित्य नसल्याने हे कर्मचारी आहे तसेच नाल्यात उतरल्याचे चित्र दिसून आले. तर काही ठिकाणी हे कर्मचारी कोणताही दोर न बांधता धोकादायक रित्या काम करताना पहायला मिळत आहेत.
त्यामुळे घाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायद्याने बंधनकारक असलेली सुरक्षा साधने न देताच त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा घाट ठेकेदारांकडून घातला जात आहे. विशेष म्हणजे नाले सफाईचे काम सुरू झाले आहे, हे दाखविण्यासाठी आयुक्तांच्या बंगल्याच्या आसपास हे काम सुरू केले असले तरी नियमांना हरताळ फासत कामगारांचा जीव धोक्यात घालून चमकोगीरी करण्याची गरज आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
ठेकेदरांकडील कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा प्रावरणे देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठी काम देतानाच, करारामध्ये या बाबी नमूद करण्यात येतात. या शिवाय, कामगारांना सुरक्षा प्रावरणे घेण्यासाठी किमान वेतनातच काही रक्कम ठेकेदारांना दिली जाते. तर घाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही साधने देणे बंधनकारकच आहे. मात्र, याचे उल्लंघन करून असे प्रकार केले जात असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल. तसेच, क्षेत्रीय कार्यालयांनाही सुरक्षा साधने तपासण्याच्या सूचना दिल्या जातील.
– शिवाजी दौंडकर, कामगार कल्याण अधिकारी, महापालिका