Pune Rain : पुण्यात पावसाची संततधार कायम; वारकऱ्यांची उडाली तारांबळ, पुढचे १२ तास महत्वाचे

Pune Rain Update : आज सकाळपासूनच पुणे शहरात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी अॅारेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढचे १२ तास हे अत्यंत महत्वाचे असून या काळात जर पाऊस वाढला तर रेड अलर्ट जारी केला जाऊ शकतो, असे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई आणि पुण्यामध्ये पुढील तीन ते चार तास दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील २४ तास महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. हवामान खात्याने कोकणातील रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर मुंबई, ठाणे, पालघरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
वारकऱ्यांची तारांबळ
काल जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहूतून पंढरीकडे झाले असून, आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आळंदीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. पण रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वारकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
हेही वाचा: Pune : हरित पुण्यासाठी तीन हजार झाडांचे रोपण





