पाटस, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वहर्ष पेपर मिल्स प्रा. लि. कंपनीने हजारो लिटर सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनी परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक व खासगी जलसाठा दूषित केल्याप्रकरणी पेपर मिल्स कंपनीची गुरुवार (दि.३) प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार केली आहे. पाटस हद्दीतील रोटी व पाटस सीमावर्ती भागात पेपर पृष्ठा निर्मितीचा मिल्स कंपनी आहे. कंपनी डोंगराळ भागात असून काही मीटरवर वन विभागाचे क्षेत्र आहे. परिसरात मेंढपाळ समाजाकडून मेंढा चरण्यासाठी व वन विभागातील वन्यजीव प्राणी या परिसराचा वापर करत आहेत. पेपर कंपनी चालकांकडून सांडपाणी जाणीवपूर्वक उघड्यावर सोडल्यामुळे पाटस ग्रामपंचायत प्रशासनाने नोटीस बजावली होती. मात्र, कंपनी चालकांकडून वारंवार प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून जल प्रदूषण केले जात आहे. पेपर मिल्सचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात उघड्यावर सोडल्याने तलावाच्या पाण्यावर तरंग निर्माण झाला आहे. पाण्याचा उग्र वास येत आहे. पेपर मिल्स कंपनीपासून काही मीटरवर असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रातील वन्यजीव प्राण्यांच्या वावर या भागात असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फेब्रुवारी २०२२ मध्ये पेपर मिल्स कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर पेपर मिल्स कंपनीतील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत टाक्यांचा व शोष खड्ड्यांचा वापर करावा, असे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. कंपनीने संमती अर्जात प्रक्रिया केलेले सांडपाणी निर्मिती शून्य असल्याची माहिती नमूद केली होती. मात्र, पेपर मिल्क कंपनीकडून जल प्रदुषणाचे नियम धाब्यावर बसवून सांडपाणी उघड्यावर सोडून नैसर्गिक स्रोत दूषित केले जात आहेत. पेपर मिल्स कंपनीकडून रोज हजारो लिटर सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. हे सांडपाणी तलावात एकत्र होत आहे. यामुळे परिसरातील नैसर्गिक स्रोत कायमस्वरूपी दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्वरित घटनास्थळाची पाहणी करून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. स्वहर्ष पेपर मिल्सकडून जल प्रदूषणाचे नियम मोडीत काढून उत्पादन केले जात आहेत. सांडपाणी वारंवार उघड्यावर सोडले जात असल्याने परिसरातील शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. कंपनीने पाणी दूषित केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे. -बाबा कोळेकर, शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य, पाटस. पाटस येथील स्वहर्ष पेपर मिल्स कंपनीने उघड्यावर सोडलेल्या सांडपाण्याचे दोन दिवसात नमुने जमा करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. – कन्हैय्या लंगोटे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे. एक महिन्यापूर्वी कंपनी चालू केली आहे. पावसामुळे पाणी पातळी वाढली असल्याने पाणी कंपनी बाहेर गेले आहे. मात्र, ते पाणी साधे असून रासायनिक पाणी नाही. यापुढे कंपनीचे पाणी बाहेर येणार नाही, याबाबत योग्य उपाययोजना करणार आहे. -सचिन गदादे, स्वहर्ष पेपर मिल्स प्रा. लि.