पुणे जिल्हा | दूषित पाणी शेतीसाठी विष ठरणार

लोणी काळभोर, (वार्ताहर)- ऐन पाणी टंचाईच्या काळात जुना मुठा उजव्या कालव्यातील दूषित पाणी शेतक-यांच्या दृष्टीने “अमृत” ठरले आहे. मात्र हे पाणी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शुद्ध करुन पुणे महानगरपालिकेने द्यावे अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे. असे न झाल्यास आगामी काळात हे पाणी “विष” ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे महापालिका व पाटबंधारे विभाग यांच्यामध्ये सन १९९७ साली झालेल्या करारानुसार वाढीव मिळालेल्या सहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया पूर्ण करून ते पाणी जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पुरविण्यास येते. या करारात पाणी शुद्ध करून पुरवावे असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
परंतु पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे हवेली तालुक्यातील फुरसुंगी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरूळी कांचन या मोठ्या गावांबरोबरच हे पाणी जेथे जाते तेथील सर्वच गावातील पाण्याचे उदभव दूषित होण्याचा धोका आहे. परिणामी आगामी काळात नागरिकांना दूषित पाण्यामुळे होणार्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागण्याची दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे या पट्टय़ातील सर्वच ग्रामपंचायतींनी नवीन मूठा उजव्या कालव्याच्या शेजारी जागा घेऊन पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी खोदल्या आहेत. पूर्वी फक्त नवा कालवा चालू असल्याने त्याचे स्वच्छ पाणी विहिरीत येत होते. हे स्वच्छ पाणी पिण्यासाठी नागरिकांना पुरविले जात होते. दि. २८ डिसेंबर २०१५ पासून जुन्या मूठा उजव्या कालव्यामधून हे दूषित पाणी सोडण्यास महानगरपालिकेने सुरवात केली आहे.
हे दूषित पाणी आगामी काळात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत उतरून पाणी खराब होण्याची शक्यता आहे. परिसरातील अपवाद वगळता कुठल्याच ग्रामपंचायतीकडे स्वतःचा पाणी पिण्यायोग्य शुद्धीकरण फिल्टर प्लॅन्ट नाही. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होणार यात शंका नाही.
हवेली तालुक्यातील नागरिक आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याने बहुतांश नागरिकांनी बाटलीबंद पाणी पिण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. काही नागरिकांनी खर्च करून स्वतःच्या घरात पाणी शुद्ध करण्याच्या छोट्या छोट्या मशिन विकत घेऊन बसविल्या आहेत. मुंढवा येथील जॅकवेल प्रकल्प उत्तम रितीने चालवून पाणी शुद्ध केल्यानंतरच कालव्यात सोडावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.
भूगर्भातील पाणीपातळी घटली
दुसऱ्या बाजूला हे पाणी जर जुन्या मुठा उजव्या कालव्याला सोडले नसते तर विदर्भ-मराठवाडय़ातील शेतकरी आत्महत्येसारखे प्रकार हवेली तालुक्यात ही घडले असते. यंदाच्या मोसमात पाऊस कमी प्रमाणात पडला आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस झाला.
त्यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही चारही धरणांत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे नवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी दि. ९ मे पासून बंद केले आहे. कमी पाऊस, कालव्याला पाणी नाही. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खुपच खालावली आहे. ज्या विहिरीचे पाणी कडक उन्हाळ्यात निघत नव्हते, अशा विहिरी कोरड्या पडत चालल्या आहेत.
…तरच शेती पिकेल अन् टिकेल
शेतकऱ्यांनी केलेल्या पिकांना पाणी देणे अवघड होत चालले आहे. डोळ्यादेखत सोन्यासारखी पिके जळून खाक होत आहेत. अशावेळी पुणे महानगरपालिकेच्या कृपेने (?) जुन्या मुठा उजव्या कालव्याला सांडपाणी आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकऱ्यांनी शेतीतील पिके जळून जाण्यापेक्षा हे खराब पाणी स्वीकारले आहे.
शेतीसाठी हे पाणी अतिशय महत्त्वाचे व उपयोगी असल्याने हे पाणी बंद करू नये. फक्त मुंढवा येथील जॅकवेल प्रकल्प दर्जेदार रितीने आंतरराष्ट्रीय मानके प्रमाण मानून चालवावा. त्यामुळे सांडपाणी शुद्ध होईल, नागरिकांना प्यायला शुद्ध पाणी मिळेल तर शेतकऱ्यांची शेती पिकेल, अशी मागणी नागरिक करीत आहेत.





