पुणे : सोन्याचे दर सध्या उच्च पातळीवर आहेत. एकूण परिस्थिती पाहता आगामी काळातही सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक आणि दागिने म्हणून ग्राहकांची सोने खरेदीची इच्छा कायम असल्याचे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे बराच काळ दुकाने बंद होती. त्याचबरोबर नागरिकांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे दागिने व्यवसाय कसा चालत आहे, असे विचारले असता गाडगीळ म्हणाले की, मार्च महिन्यापासून काही प्रमाणात विक्री कमी झाली आहे. मात्र पर्यटन, मनोरंजन, कपडे, हॉटेलींग इत्यादी क्षेत्रातील नागरिकांचा खर्च कमी होऊन तो आता सोन्याकडे वळू लागला आहे. त्याचबरोबर सोन्याने चांगला परतावा दिला आहे. आगामी काळातही चांगला परतावा मिळेल म्हणून ग्राहकांची सोने खरेदीची इच्छा कायम आहे.
पीएनजी ज्वेलर्सने सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. सोन्याचे दर जास्त असल्यामुळे एक हाती खरेदी करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना टप्प्याटप्प्याने सोने खरेदीची योजना उपलब्ध केली असून याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. स्वर्गीय दाजीकाका गाडगीळ यांच्या नावाने दाजीकाका प्रॉमिस प्लॅन 100 या नावीन्यपूर्ण उपक्रमाची घोषणा केली आहे.
लॉकडाऊननंतर स्थानिक कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न नव्हता. मात्र, दागिने तयार करणारे कारागीर पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतून आले होते, ते परत गेले आहेत. परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल असे त्यांनी सांगितले. दागिने खरेदी कमी झाली असली तरी ज्वेलर्सकडे असलेल्या इन्व्हेंटरीतील सोन्याचे दर 18 टक्क्यांनी वाढले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गुंतवणुकीच्या इतर साधनापेक्षा सोन्याने ग्राहकांना खात्रीने अधिक परतावा दिला आहे. आगामी काळात औद्योगिक उत्पादन कमी होणार असल्यामुळे शेअरमधून खात्रीने परतावा मिळण्याची शक्यता नाही. व्याजदर कमी होत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातही मंदी आहे. या कारणामुळे आगामी काळात ग्राहक आपल्या गुंतवणुकीतील काही भाग सोन्यासाठी राखून ठेवतील. त्यामुळे आगामी काळातील सोने चांगला परतावा देण्याची शक्यता असल्याचे त्यांना वाटते. ग्राहकांना कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून पीएनजी ज्वेलर्सच्या दालनात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.