पिंपरी | ग्राहकांची रेडीमेड आमरस, पुरणपोळ्यांना पसंती

पिंपरी, (प्रतिनिधी) – अक्षयतृतीया म्हणजे घरोघरी पुरणपोळी अन् आंब्याचा रस ठरलेला. त्यासाठी लगबगीने तयारीदेखील केली जाते. परंतु या धावपळीच्या युगात घरी आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा बेत करणे अनेकांना शक्य होत नाही.
त्यामुळे बाजारातून तयार आंब्याचा रस व पुरणपोळ्या बनवून घेतल्या जात आहेत.तर ग्राहकांचा कल लक्षात घेत, शहराच्या विविध भागांमध्ये हे दोन्ही खाद्यपदार्थ उपलब्ध होते.तर ग्राहकांकडूनदेखील या खाद्यपदार्थांना मोठी मागणी होती.
रेडिमेड आंब्याचा रस आणि पुरणपोळी खाण्याकडे नागरिकांचा कल असून मोठ्या प्रमाणावर अक्षयतृतीयेनिमित्त मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. अक्षयतृतीयेपासून नागरिक फळांचा राजा आंबा खाण्यास सुरुवात करतात, अशी परंपरा मानली जाते. त्यामुळे अक्षयतृतीयेला आंब्याचा रस यासह पुरणपोळीचा बेत घरोघरी आखला जातो.
यादिवशी प्रामुख्याने याचा देवासमोर नैवेद्यही दाखविला जातो. शहरात मात्र घरातील प्रत्येक व्यक्ती धावपळीच्या काळात आपल्या कामात व्यस्त असल्याने आंबे आणून त्याचा रस तयार करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे बाजारात ज्यूस विक्रेत्यांनी आंब्याचा रस तयार करून विकण्यास सुरवात केली आहे.
आपली आवड व बजेटनुसार हापूस, केशर, बदाम यासारख्या आंब्याचा रस विक्रेत्यांकडून तयार करून दिला जातो. प्रतिलिटर याप्रमाणे रसाची विक्री केली जाते. सध्या 100 ते 350 रुपये लिटरपर्यंत आंब्याच्या प्रकारानुसार रसाचे दर आकारले जात आहेत. नागरिकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत असून अक्षयतृतीया दिवशी मोठी विक्री झाली.
अक्षयतृतीयेला आंब्याच्या रसासह खवय्ये पुरणपोळी वर ताव ताव मारतात. सध्या बाजारात पुरणपोळीदेखील तयार करून मिळते. 30 रुपयांना एक नग अशा दराने पुरणपोळी बाजारात उपलब्ध आहे.
असे आहेत तयार आमरसाचे दर
हापूस आमरस- 150 ते 350 रुपये लिटर
केसर आमरस – 100 ते 200 रुपये लिटर
बदाम आमरस – 100 ते 150 रुपये लिटर





