प्रभात वृत्तसेवा पुणे – नियोजित गृहप्रकल्पाच्या परिसरात उच्चक्षमतेच्या वीज वाहिनीचा धक्का लागल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात घडली. बांधकाम मजुराच्या सुरक्षेबाबात पुरेशी काळजी न घेतल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.पवन दित्या नायक (३३, रा. मध्य प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी परिसरातील हरपळे वस्तीत एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या भागात महावितरणचे मनोरे आहेत. तेथे उच्चक्षमतेची वीज वाहिनी आहे. २६ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नायक तेथे काम करत होता. नायक याच्या हातातील बांबूचा स्पर्श वीज वाहिनीला झाला. विजेच्या धक्क्याने नायक गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला फुरसुंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. नियोजित गृहप्रकल्पाच्या परिसरात महावितरणचा मनोरा आहे. तेथून उच्च क्षमतेची वीज वाहिनी जाते. बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षेविषयी पुरेशी काळजी घेतली नाही, तसेच बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी गु्न्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंंदारे तपास करत आहेत.