प्रभात वृत्तसेवा पुणे – नियोजित गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना तळजाई परिसरात घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रसाद अशोक जाधव (२७) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदार गणेश नामदेव जागडे (३९, रा. वडगाव खुर्द, सिंहगड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप चव्हाण यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनकवडी भागातील तळजाई पठार परिसरात २४ जुलै रोजी गृहप्रकल्पाचे कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बांधकाम मजूराचा मृत्यू झाला. या घटनेची पोलिसांनी चौकशी करीत, पुरेशी सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने गंभीर दुर्घटना घडल्याने ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार डी. व्ही. धोत्रे पुढील तपास करीत आहेत.