पुणे : लष्करातर्फे जुन्या कमांड रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या क्षमतेने आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत. पुण्याच्या जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पाठविण्यात आलेल्या नागरी रुग्णांवरील उपचारासाठी या सुविधा उभारण्यात आल्या असल्याची माहिती लष्करातर्फे देण्यात आली.

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी साहाय्य करावे, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाला केले होते. तसेच जिल्हा प्रशासनानेही या कामी लष्कराची मदत मागितली होती. त्यानुसार लष्कराच्या दक्षिण मुख्यालयांतर्गत लष्करी वैद्यकीय सेवेचे जुने कमांड हॉस्पिटलमध्ये नागरी भागातील राहिवाशांवर उपचार करण्यासाठी सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी या रुग्णालयात डॉक्टर्स आणि वैद्यकीय सहाय्यकांचे समर्पित पथक तैनात करण्यात आले आहे.”

लष्कराच्या दक्षिण मुख्यालायाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी मंगळवारी (दि.27) जुन्या कमांड हॉस्पिटल संकुलाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि महामारीविरोधात सुरु असलेल्या लढ्यात ते करीत असलेल्या समर्पित देशसेवेबद्दल त्यांचे कौतुक केले.