अयोध्या: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) बांधकाम पूर्ण झाले असून, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्य मंदिरावर ‘ध्वज स्थापना’ (Dhwaj Sthapana) समारंभ होणार आहे. हा सोहळा जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभाप्रमाणेच अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात साजरा करण्याची तयारी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने केली आहे. ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी सोमवारी (दि. २७) सांगितले की, मुख्य मंदिरासह परकोटातील भगवान शिव, गणेश, हनुमान, सूर्य, माता भगवती, अन्नपूर्णा आणि शेषावतार या सहा उपमंदिरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच, सप्त मंडप, संत तुलसीदास मंदिर आणि जटायू-गिलहरीच्या प्रतिमांची स्थापनाही पूर्ण झाली आहे. भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेले सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या ध्वज स्थापना सोहळ्याला देशातील भाजपचे मोठे नेते, केंद्रीय मंत्री आणि संत-महात्मा उपस्थित राहणार आहेत. सुमारे ३००० व्हीव्हीआयपी लोकांसाठी हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. या दिवशी अयोध्येत जगातील सर्वात मोठी स्काउट-गाईड जम्बूरी आयोजित केली जाणार आहे, ज्यात ३५,००० हून अधिक कॅडेट्स सहभागी होतील. अनेक प्रसिद्ध कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा सोहळा: ध्वज स्थापनेनंतर उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या (BJP) प्रचाराचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पंतप्रधान मोदींना विकसित उत्तर प्रदेश अभियानाच्या यशाबद्दल माहिती देतील. तसेच, पंतप्रधान मोदी याच दिवशी नोएडा जवळील जेवर येथे तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणीही करणार आहेत. हा ध्वज स्थापना समारंभ धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असून, अयोध्येसह संपूर्ण देश-प्रदेशात पुन्हा एकदा धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करेल.