राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुमच्या मताची किंमत मीठ-मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्यादिवशी तुम्हाला कळेल, तेव्हा ते मत विकत घेऊ पाहणाऱ्या इतके कंगाल कोणीच नसेल. ज्या काळामध्ये एक व्यक्ती म्हणून जगणे कठीण होते, त्या काळात जगप्रसिद्ध विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक अखंड प्रेरणास्त्रोत आहेत.

समकालीन स्थितीमध्ये त्यांच्या प्रखर विचारांची नितांत गरज वाटते. परिस्थितीशी लढा देत, संघर्ष करीत त्यांनी आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. भिवा नावाच्या बालकाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यंतचा प्रवास असंख्य बाबी आपल्यास शिकवून जातो. मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स अशा जागतिक दर्जाच्या विद्यापीठात ते शिकले. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. एकूण 32 पदव्या त्यांनी घेतल्या होत्या. उच्च शिक्षणासाठी सयाजीराव महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊ केली होती.

जगभरातील विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करून जगातील सर्वाधिक मोठ्या लोकशाहीप्रधान देशाचे भारतीय संविधान त्यांनी लिहिले. म्हणून त्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतो. त्यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून अत्यंत महत्वपूर्ण असे योगदान दिलेले आहे. आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण जीवनकाळात अनेक महत्वपूर्ण पुस्तके लिहिली. ज्यामध्ये कास्ट इन हिंदू, दि प्रॉब्लेम ऑफ रूपी, अनिहीलेशन ऑफ कास्ट, दि अनटचेबल, व्हू वेयर शूद्रा, बुद्धा अँड हिज धर्मा यांचा समावेश होतो. बाबासाहेब यांनी पत्रकार म्हणून केलेले कार्यही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी बहुजनांच्या प्रश्‍नाला वाचा फोडण्याचे कार्य केले. वृत्तपत्र हे मतपत्र असते आणि ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते, अशी ठाम भूमिका ते मांडतात. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत आदी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून त्यांनी आपले परखड विचार मांडले. ज्यामुळे तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये एक प्रकारची जागृती होण्यास मदत झाली. त्यांनी केलेली भाकिते आज खरी होताना दिसतात.

महाडचे चवदार तळे सत्यागृह, मनुस्मृती दहन, शेतकरी कामगार चळवळ, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, येवला परिषद, बौद्ध धर्मात प्रवेश या काही महत्वपूर्ण बाबी त्यांच्या जीवनाची एक बाजू आपल्या समोर मांडतात. ज्यातून ते खऱ्या अर्थाने घडले. या संघर्षशील घडण्यातून त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा, समता सैनिक दल, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, पीपल्स एजुकेशन सोसायटी, भारतीय बौद्ध महासभा या संस्थांची स्थापना केली.

सध्या देशामध्ये निवडणुकांचा काळ चालू आहे. निवडणूक प्रक्रियेतून चांगले लोक तयार होत नसतील तर निवडणुका महत्वाच्या नाहीत. लोकांना निवडणुकांपेक्षा आपल्या मुलभूत गरजांची काळजी जास्त असते. अशी परखड भूमिका त्यांनी मांडली आहे. राजकीय लोकशाही ही सामाजिक लोकशाही झाली पाहिजे यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. राष्ट्र उभारणीमध्ये त्यांचे असलेले योगदान शब्दातीत आहे. सर्व महापुरूषांच्या विचारांचा जागर करणे अपेक्षित असताना असताना आपण त्यांचे विचार आचरणात आणायचे सोडून भलत्याच गोष्टी करू लागलो आहोत. समताधिष्टित समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांनी उभे आयुष्यभर प्रयत्न केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणाऱ्या अर्थतज्ञ, वकील, शिक्षक, तत्वज्ञ, पत्रकार, चित्रकार, राजकारणी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

– श्रीकांत येरूळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.