पुणे : पोटगी वसुली वॉरंट बजावण्यासाठी महिलेकडे पाच हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्या वाघोली पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. मंगळवारी (दि. २५) दुपारी वाघोली पोलीस ठाण्यासमोरच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. परमेश्वर मानिक पाखरे (वय ३७) असे लाच स्विकारणार्या हवालदाराचे नाव आहे. पाखरे याच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ३३ वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार महिला यांचे पतीसोबत २०१५ पासून कौटुंबिक वाद सुरू असून त्यांनी पोटगीसाठी विटा येथील न्यायालयात दावा दाखल केला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत २०१५ पासून प्रति महिना पाच हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मात्र, पतीने पोटगी दिली नसल्याने न्यायालयाने एकूण ६ लाख ६५ हजार रुपये थकीत रकमेची वसुली करण्यासाठी जप्ती व विक्रीचे वॉरंट जारी केले. हे वॉरंट तक्रारदार महिलेने स्वतः वाघोली पोलीस ठाण्यात दिल्यानंतर हवालदार पाखरे यांनी वॉरंट बजावून रिपोर्ट देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच वारंवार मागितली. याबाबत महिलेने सोमवारी (दि.२४) एसीबीकडे धाव घेत तक्रार दिली. मंगळवारी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यात आरोपी हवालदार पाखरे यांनी वसुली वॉरंटची बजावणी करून रिपोर्ट देण्यासाठी लाचेची मागणी केली व ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच दिवशी वाघोली पोलीस ठाण्याजवळील अहिल्यानगर रोडवरील चहाच्या टपरीवर सापळा रचून पाखरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.