नवी दिल्ली – हिंडेनबर्ग संस्थेने केलेल्या आरोपांवर भाजपने सोमवारी आक्रमक शैलीत प्रतिक्रिया दिली. ते आरोप म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला कमजोर बनवण्याचे व्यापक कारस्थान असल्याचे त्या पक्षाने म्हटले. तसेच, संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) मार्फत चौकशीची कॉंग्रेसने लावून धरलेली मागणी फेटाळून लावली. भाजपची भूमिका मांडण्यासाठी ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद पुढे सरसावले. अदानी समुहाने शेअर बाजारात अनियमितता केल्याचे आरोप याआधी अमेरिकास्थित हिंडेनबर्गने केले होते. त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सेबीने चौकशी हाती घेतली. चौकशीचा भाग म्हणून सेबीने हिंडेनबर्गला नोटीस पाठवली. त्यावर उत्तर न देणाऱ्या हिंडेनबर्गने थेट सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना लक्ष्य केले. हिंडेनबर्गमध्ये बडे गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांची गुंतवणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अपप्रचार करण्यासाठी सोरोस ओळखले जातात, असे प्रसाद पत्रकारांशी बोलताना म्हणाले. प्रसाद यांनी कॉंग्रेसवरही जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. जागतिक स्तरावर सुरक्षित, स्थिर आणि आशादायी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. मात्र, भारतातील गुंतवणूक विषयक स्थिती सुरक्षित नसल्याचे चित्र कॉंग्रेस उभे करू इच्छित आहे. कोट्यवधी छोट्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून चांगला परतावा मिळत आहे. मात्र, शेअर बाजार कोसळावा असे कॉंग्रेसला वाटते. जनतेने नाकारल्यानंतर तो पक्ष इतरांना हाताशी धरून देशात आर्थिक अराजकता, अस्थिरता आणू पाहत आहे. अर्थात, गुंतवणूकदारांना कारस्थानाची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी बाजाराला धक्का देण्याचे प्रयत्न नाकारले, अशी टिप्पणीही त्यांनी केली.